करुणा यांच्या पोटगीतील 50 टक्के रक्कम कोर्टात जमा करा, न्यायालयाचे आदेश; धनंजय मुंडेना हायकोर्टाचा दणका

घरगुती हिंसाचार प्रकरणी कौटुंबिक न्यायालयाने दोषी ठरवलेल्या अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज दणका दिला. पत्नी करुणा हिला पोटगी नाकारण्याची मुंडे यांची मागणी फेटाळून लावत कौटुंबिक न्यायालयाने लागू केलेल्या पोटगीची 50 टक्के रक्कम जमा करण्याचे आदेश न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठाने दिले आहेत. महिनाभराच्या आत ही रक्कम कनिष्ठ न्यायालयात जमा करण्यास हायकोर्टाने बजावले आहे.

वांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयाने माजी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना दणका देत घरगुती हिंसाचार प्रकरणात प्रथमदर्शनी दोषी ठरवले तसेच पत्नी करुणा यांनी केलेले आरोप सकृत्दर्शनी मान्य करत मुंडे यांना पत्नीला 1 लाख 25 हजारांची पोटगी व मुलगी शिवानी हिला 75 हजार रुपये दरमहा देण्याचे आदेश दिले होते. मात्र मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावत पत्नी व मुलीला दरमहा पोटगी देण्यास नकार देत वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या निकालाला सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.