
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्राला घरी बोलावून लोखंडी कोयत्याने उजवा हात कोपरापासून तोडणाऱ्या मंगेश यशवंत गवस ( रा. मणेरी-दोडामार्ग ) यांचा जामीन अर्ज येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस डी जगमलानी यांनी फेटाळून लावला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक अभियोक्ता स्वप्नील सावंत यांनी काम पाहिले.
संशयित गवस हे मुंबई येथे बेस्टमध्ये वाहन चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मित्र महेश अनंत आलव व आपली पत्नी यांच्या अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे महेश याला ४ ऑक्टोबर रोजी मणेरी येथील घरी बोलावून घेत सायंकाळी त्यांच्या मानेवर मारण्यासाठी लोखंडी कोयता मंगेश यांनी उगारला. तो वाचविण्यासाठी महेश यांनी उजवा हात समोर केला असता तो हात कोपरापासून तुटला होता. याची फिर्याद ७ ऑक्टोबर रोजी जखमी महेश यांनी दिल्यानंतर मंगेश यांच्यावर दोडामार्ग पोलीस ठाण्यात ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी संशयित मंगेश याला अटक करून दोडामार्ग न्यायालयात हजर केले असता ११ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर ते न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, आपल्याला जामीन मिळावा असा अर्ज मंगेश यांनी जिल्हा न्यायालयात केला होता. तो फेटाळण्यात आला.
































































