
कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या लसीकरणाचा वेग आणखी वाढावा यासाठी रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्याने शिवडीमध्ये तीन दिवसांची विशेष कोव्हॅक्सिन लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत एकूण 4 हजार 660 रहिवाशांचे लसीकरण करण्यात आले.
शिवडी येथे प्रभाग क्रमांक 206 मधील नागरिकांसाठी मुंबई महापालिकेच्या वतीने सेलस्टिया पालिका वाहनतळ येथे तीन दिवस कोव्हॅक्सिन लसीकरण मोहीम राबवण्यात आली. यात गुरुवार, 5 ऑगस्टला 1,030 रहिवाशांचे, शुक्रवार, 6 ऑगस्टला 1,710 जणांचे तर शनिवार, 7 ऑगस्टला 1,920 जणांचे लसीकरण करण्यात आले. शिवसेना आमदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांच्या प्रयत्नांनी आणि शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे यांच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेला रिलायन्स फाऊंडेशन व त्यांची टीम तसेच एफ-दक्षिण महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अनिता इनामदार आणि त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले. ‘माझा प्रभाग माझी जबाबदारी’ या मोहिमेअंर्तगत ही लसीकरण मोहीम राबवण्यात आली.




























































