कोव्हॅक्सिनला डब्ल्यूएचओच्या मंजुरीसाठी आणखी प्रतीक्षा, 3 नोव्हेंबरला पुढील बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस ‘कोव्हॅक्सिन’ला जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) मंजुरी मिळवण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. या मंजुरीसाठी ‘तारीख पे तारीख’ सुरू असून आता 3 नोव्हेंबरला पुढील बैठक होणार आहे. त्यात या मंजुरीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. लस उत्पादक ‘भारत बायोटेक’ला लसीबाबत अतिरिक्त माहिती सादर करावी लागणार आहे.

डब्ल्यूएचओच्या तांत्रिक सल्लागार समूहाची मंगळवारी बैठक झाली. जर लसीच्या संपूर्ण माहितीवर आमचे समाधान झाले तर पुढील 24 तासांच्या आत मंजुरीचा निर्णय घेतला जाईल, असे तांत्रिक सल्लागार समूहाने बैठकीआधी स्पष्ट केले होते. मात्र त्या बैठकीत कोवॅक्सिनला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला नाही. तांत्रिक सल्लागार समूहाची 3 नोव्हेंबरला पुढील बैठक होणार असून त्यात या लसीचा जागतिक पातळीवर वापर करण्याबाबत अंतिम मूल्यांकन केले जाणार आहे. भारत बायोटेकने डब्ल्यूएचओची मंजुरी मिळवण्यासाठी 19 एप्रिलला अर्ज दिला होता. मंजुरीच्या रखडपट्टीमुळे कोव्हॅक्सिन घेणारे नागरिक परदेश प्रवास करू शकत नाही. कोवॅक्सिनला मंजुरी मिळाल्यानंतर लसीच्या प्रमाणपत्राचा पासपोर्टप्रमाणे वापर केला जाऊ शकणार आहे. तसेच भारत बायोटेकला ही लस जगभरात निर्यात करता येणार आहे. कोवॅक्सिनला आतापर्यंत 13 देशांमध्ये मंजुरी मिळाली आहे.

78 टक्के प्रभावी व सर्व व्हेरिएंटवर परिणामकारक

कोव्हॅक्सिन लस भारत बायोटेक आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांनी एकत्र मिळून बनवली आहे. तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्सनंतर पंपनीने दावा केला होता की, ही लस कोरोनाचा संसर्ग रोखण्याकामी 78 टक्के प्रभावी आहे. तसेच ती कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटवर परिणामकारक असल्याचा दावा आयसीएमआरने केला आहे. केवळ लंडन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकन व्हेरिएंट्सवर नव्हे तर हिंदुस्थानच्या 10 हून अधिक राज्यांमध्ये आढळलेल्या डबल म्यूटेंट व्हेरिएंटवरदेखील ही लस परिणामकारक सिद्ध झाली आहे.