343 नमुन्यांमध्ये ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे प्रमाण 54 टक्के; कोविड जनुकीय सूत्र निर्धारण तिसऱ्या चाचणीचे निष्कर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविड-19 विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणारी वैद्यकीय यंत्रणा मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यान्वित आहे. या यंत्रणेने आजपर्यंत दोन तुकड्यांमध्ये चाचण्या केल्यानंतर आता तिसऱ्या तुकडीतील चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात केले आहेत. तिसऱ्या तुकडीमध्ये एकूण 343 रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. यात ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे प्रमाण 54 टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे 34 टक्के तर इतर प्रकारांचे 12 टक्के रुग्ण आढळले आहेत. कोविड लसीकरणाचा प्रभाव म्हणून साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे या निष्कर्षांवरुन आढळत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी कोविड लस घेणे आवश्यक असून कोविड प्रतिबंधक निर्देशांचे कठोरपणे पालन करणे आवश्यक आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये तिसऱ्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण 343 रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली. नमुने घेतलेल्या बाधित 343 रुग्णांपैकी 45 रुग्ण (13 टक्के) रुग्ण हे 0 ते 20 वर्षे वयोगटातील आहेत. 21 ते 40 वर्षे वयोगटात 126 रुग्ण (37 टक्के), 41 ते 60 वर्षे वयोगटात 98 रूग्ण (29 टक्के) 61 ते 80 वयोगटात 63 रुग्ण (18 टक्के) आणि 81 ते 100 वयोगटातील 11 रुग्ण (3 टक्के) या चाचणीमध्ये समाविष्ट आहेत.

चाचणीतील निष्कर्षानुसार, 343 पैकी 185 रुग्ण (54 टक्के) हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ तर 117 रुग्ण (34 टक्के) हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित नमुन्यांमध्ये इतर प्रकारांचे 40 बाधित रुग्ण (12 टक्के) असल्याचे निदर्शनास आले आहे. डेल्टा व्हेरिअंट आणि डेल्टा डेरिव्हेटीव्ह या दोन्ही प्रकारातील कोविड विषाणू तुलनेने सौम्य त्रासदायक असून त्यापासून तितकासा गंभीर धोका संभवत नाही. डेल्टा व्हेरिअंट समवेत तुलना केल्यास, डेल्टा डेरिव्हेटीव्ह आणि इतर प्रकाराचे विषाणू यांचा संक्रमण / प्रसार वेग देखील कमी असल्याचे आढळले आहे. असे असले तरी, कोविड बाधा निष्पन्न झाल्यानंतर वेळीच व योग्य वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोविड लसीकरण हा निकष विचारात घेतल्यास, पहिला डोस घेतलेल्या 54 नागरिकांना कोविड बाधा झाली तरी फक्त 7 जणांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. 54 पैकी एकाही नागरिकाला प्राणवायू पुरवठा, अतिदक्षता उपचार यांची गरज भासली नाही. तसेच यातील कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दोन्ही डोस घेतलेल्या 168 नागरिकांना कोविड बाधा झाली असली तरी त्यापैकी फक्त 46 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातही अवघ्या 7 जणांना अतिदक्षता उपचारांची गरज भासली. मात्र कोणाचाही मृत्यू ओढवला नाही, ही बाब नमूद करण्याजोगी आहे.

याउलट, लसीचा एकही डोस न घेतलेल्या 121 नागरिकांना बाधा झाली. त्यातील 57 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. एका रुग्णास प्राणवायू पुरवठा, एकास अतिदक्षता उपचार पुरवावे लागले. तर तीन जणांचा मृत्यू ओढवला आहे. मृत्यू ओढवलेले तिघेही रुग्ण वयोवृद्ध तसेच मधुमेह व अति उच्च रक्तदाबग्रस्त होते. यातील दोघांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ तर एकास ‘डेल्टा व्हेरिअंट’ ची लागण झालेली होती. मात्र, या तिन्ही रुग्णांनी कोविड बाधा निष्पन्न झाल्यानंतरही रुग्णालयात दाखल होण्यास विलंब केल्याने त्यांच्या जीवावर बेतले.

कोविड लस घेणाऱ्यांना व कोविड प्रतिबंधक नियम पाळणाऱ्यांना विषाणू बाधेपासून संरक्षण मिळते तसेच बाधा झाली तरी त्याची तीव्रता रोखता येते, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे. वय वर्ष 18 पेक्षा कमी असलेला वयोगट विचारात घेतला तर, एकूण 343 रुग्णांपैकी 29 जण (8 टक्के) या वयोगटात मोडतात. पैकी 11 जणांना ‘डेल्टा व्हेरिअंट’, 15 जणांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ आणि 3 जणांना इतर प्रकाराची कोविड लागण झाल्याचे आढळले. याचाच अर्थ, तुलनेने बालक व लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचे प्रमाण पूर्णपणे नियंत्रणात आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात विषाणुंचे जनुकीय सूत्र निर्धारण वैद्यकीय प्रयोगशाळा (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब) स्थापन करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 4 ऑगस्ट 2021 रोजी त्याचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर ही यंत्रणा वैद्यकीय दृष्ट्या प्रमाणित (validation) होवून कार्यान्वित करण्यात आली आहे. या वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये जनुकीय सूत्र निर्धारण करु शकणारे दोन संयंत्र उपलब्ध आहेत. अमेरिकेतील इलुम्निया या कंपनीने, अमेरिकेतीलच अल्ब्राईट स्टोनब्रिज ग्रुप (ए. एस. जी. – बोस्टन) या संस्थेच्या माध्यमातून एकूण 6 कोटी 40 लाख रुपये किंमतीचे हे 2 जीनोम सिक्वेसिंग संयंत्र मुंबई महानगरपालिकेला दान स्वरुपात दिले आहे. विषाणूंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्याने, एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता येतो. असा फरक ओळखू आल्यानंतर उपचार पद्धतीची नेमकी दिशा स्पष्ट होते. जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणाऱ्या वैद्यकीय यंत्रणेच्या माध्यमातून यापूर्वी 23 ऑगस्ट 2021 रोजी सर्वात पहिल्यांदा तर 21 सप्टेंबर 2021 रोजी दुसऱ्यांदा कोविड नमुन्यांनी चाचणी करण्यात आली होती.

कोविड संसर्गाच्या सध्याच्या कालावधीत कोविड विषाणूचे नवनवीन प्रकार अद्यापही समोर येत आहेत. अशा स्थितीत जीनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करुन उपचारांना वेग देणे महानगरपालिका आरोग्य प्रशासनाला शक्य झाले आहे. कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण चाचण्यांचे निष्कर्ष पाहता असे लक्षात येते की, सर्व नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. तसेच कोविड-19 विषाणू प्रतिबंधक निर्देशांचे कठोर पालन प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घ्यावेत. मुखपट्टी (मास्क) चा योग्य उपयोग करावा. सार्वजनिक स्थळी सुरक्षित अंतर राखावे. गर्दी टाळावी. हातांची नियमित स्वच्छता राखावी. या सर्व बाबी प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पुन्हा एकदा करण्यात आले आहे.