रत्नागिरी जिल्ह्यात कोविडचे नवीन निर्बंध लागू; मॉल, चित्रपटगृह, नाट्यगृह, रेस्टॉरंटमध्ये 50 टक्के उपस्थिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आजपासून नवीन निर्बंध लागू केले आहेत. शासकीय कार्यालयात परवानगीशिवाय अभ्यागतांना प्रवेश नाही. मॉल, चित्रपटगृहे. नाट्यगृहे, रेस्टॉरंट, जिममध्ये लसी घेतलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून नवीन निर्बंध लागू केले आहेत. पाचहून अधिक नागरिकांच्या समुहाला पहाटे पाचपासून रात्री अकरा वाजेपर्यंत फिरण्यास बंदी राहणार आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यासाठी रात्री अकरा वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. शासकीय कार्यालयात कार्यालयीन प्रमुखाच्या लेखी किंवा स्पष्ट परवानगी शिवाय अभ्यागतांना कार्यालयात येण्यास मनाई करण्यात आली आहे.

नागरिकांसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या सुविधा देण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. खासगी कार्यालयात 50 टक्क्यांहून अधिक कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. लसीकरण पूर्ण झालेल्या कर्मचान्यां नीच कार्यालयात उपस्थित राहावे, कार्यालयामध्ये थर्मस स्कॅनर, सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लग्नसमारंभासाठी 50 व्यक्ती, अंत्यविधीसाठी 20 व्यक्ती, सामाजिक, धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी 50 व्यक्तींची मर्यादा घालण्यात आली आहे. सलून आणि ब्युटीपार्लर 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यात येतील.

एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्या आस्थापनांमध्ये इतर सुविधा बंद राहतील. शॉपींग मॉल 50 टक्के क्षमतेने कार्यरत राहतील. या मॉलमध्ये लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश द्यावयाचा आहे. रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत मॉल बंद राहतील. नाट्यगृह आणि चित्रपटगृह 50 टक्के क्षमतेने खुली राहतील. यामध्ये लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल. रेस्टॉरंट आणि उपहार गृहांसह व्यायामशाळा 50 टक्के क्षमतेने खुली राहतील. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे, असे नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत.