
मुंबईत आजपासून 30 ते 44 वर्षे वयोगटासाठीदेखील कोरोना लसीकरण सुरू झाले असले तरी पुरेसे डोस मिळत नसल्याने काही केंद्रांवर गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. काही लाभार्थ्यांना रांगेत ताटकळत राहून लस न घेता माघारी परत जावे लागत आहे. त्यामुळे मुंबईतील सर्वच लसीकरण केंद्रांवर लसींचे डोस वाढवून द्यावेत अशी मागणी शिवसेनेने पालिका प्रशासनाकडे केली आहे.
केंद्राकडून 21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा केली असली तरी मुंबई महानगरपालिकेला पुरेसे डोस मिळत नसल्याने केंद्रांना पुरेशा डोसचा पुरवठा होण्यात अडचणी येत आहेत. आतापर्यंत दिवसाला किमान 100 डोस देण्यात येत होते. मात्र आता दररोज प्रत्येक केंद्राला 300 डोस देणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र दहिसर परिसरातील अनेक केंद्रांना 100 ते 200 डोसच मिळाले. त्यामुळे लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना डोस घेता आला नाही. मुंबईतील सर्वच केंद्रांना दररोज किमान 300 डोसचा पुरवठा करावा, केंद्रावरील कर्मचाऱयांची संख्या वाढवावी, सध्याची सकाळी 10 ते सायंकाळी 3 पर्यंत असणारी लसीकरणाची वेळ रात्री 9 पर्यंत वाढवावी अशा मागण्या शिवसेनेने केल्या आहेत. याबाबत आमदार विलास पोतनीस यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना निवेदन दिले. यावेळी शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, विधी समिती अध्यक्ष हर्षद कारकर, प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, नगरसेविका शीतल म्हात्रे, उपविभागप्रमुख विनायक सामंत आदी उपस्थित होते.




























































