मुंबईत ज्येष्ठांना सोमवारपासून कोव्हिशिल्डचा दुसरा डोस मिळणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना लसीचा पहिला डोस घेऊन बारा आठवडे झालेल्या 60 वर्षांवरील ज्येष्ठांना सोमवारपासून कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. मुंबईत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आली असली तरी दररोज होणाऱया सुमारे 50 ते 60 मृत्यूंमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे पालिकेने मृत्यू रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. दिव्यांगांनाही लस देण्यात येणार आहे. शिवाय 45 वर्षांवरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही देण्यात येणार

मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कस आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ, 45 वर्षांवरील सहव्याधी असणाऱयांनंतर 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र डोसच्या अपुऱया पुरवठय़ामुळे लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी 18 वर्षांवरील सर्वांसाठी सुरू करण्यात आलेले लसीकरण थांबवण्यात आले असून सद्यस्थितीत केवळ 60 वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात आहे. यामध्ये पालिका-राज्य सरकारच्या मिळून सुमारे 40 आणि चार खासगी लसीकरण केंद्रांवर हे लसीकरण सुरू आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत सर्व गटाचे मिळून सुमारे 30 लाख डोस देण्यात आले आहेत.

आतापर्यंत 8 लाख ज्येष्ठांना डोस

मुंबईत 11 लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. यातील 8 लाख जणांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. कोरोनाचा धोका ज्येष्ठांना सर्वाधिक आणि कोरोनाची लाट येण्याची शक्यता यामुळे या वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण वेगाने करण्यात येणार आहे.

तीन दिवस नोंदणीने, तीन दिवस वॉक इन

सोमवारपासून होणाऱया लसीकरणात तीन दिवस कोविन अॅपवर नोंदणीने आणि तीन दिवस ‘वॉक इन’ पद्धतीने डोस देण्यात येणार आहेत. पहिले तीन दिवस ज्येष्ठ आणि दिव्यांगांना सोमवार, मंगळवार, बुधवार ‘वॉक इन’ पद्धतीने तर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस 45 वर्षांवरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस ‘कोविन अॅप’वर नोंदणी केल्यानंतरच दिला जाणार आहे. तर 60 वर्षांवरील ज्येष्ठांना कोव्हिशिल्डचा पहिला डोस देण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. रविवारी लसीकरण बंद राहणार आहे.