
>> अश्विन बापट
मूळच्या साताऱयातल्या कामाक्षी जोगळेकर-बर्वे यांनी 2010 मध्ये नवी वाट निवडली आणि आज 14 वर्षांनी ‘बरवा’ हा त्यांचा ब्रँड सौंदर्य उत्पादनांमधला आघाडीचा ब्रँड झालाय.
या प्रवासाबद्दल कामाक्षी म्हणाल्या, मी पेशाने फॅशन डिझायनर आहे. 22 वर्षे मी ते काम केलेय. लग्न झाल्यावर मी विटय़ामध्ये वास्तव्याला होते. मग पाच वर्षांनी परत साताऱयात गेले. एक घटना ज्याने माझ्या करीअरची दिशा बदलून टाकली असे आपण म्हणू या. ती घटना सांगते, माझी मुलगी साधारण दोन ते अडीच वर्षांची होती तेव्हा तिने माझी नजर चुकवून लिपस्टिक हातात घेतली आणि ती चक्क चावून खाल्ली. तिच्या दातातून ती काढायला फार कष्ट घ्यावे लागले तेव्हा माझ्या चटकन लक्षात आले, आपल्यालाच ही परिस्थिती बदलावी लागेल. केमिकलची उत्पादने न वापरता नैसर्गिक उत्पादनांचा वापर सुरू करावा लागेल. ‘बरवा’ ब्रँडकडे पडलेले हे पहिले पाऊल होते. मग पुढच्या काही वर्षांत माझे पती हे जर्मनीत त्यांच्या कामासाठी गेले असता तिथे ‘बायोफाक’ नावाचे सेंद्रिय पदार्थांविषयीचे मोठे ट्रेड फेअर भरले होते, जिथे ऑर्गेनिक कॉस्मेटिक्सचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तो माझ्यासाठी ट्रिगर पॉइंट होता. मग तुपापासून बनवलेल्या लिपस्टिक्सचे पेटंट असलेल्या पुण्याच्या अनघा दंडवतेंचा मी शोध घेतला आणि त्यांच्याशी संपर्क करत त्यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली. पुढे 2010 मध्ये युथोपिया नावाने कंपनी रजिस्टर केली आणि 2012 पासून माझ्या ‘बरवा’ ब्रँडने खऱ्या अर्थाने टेकऑफ घेतला.
‘बरवा’ शब्दाचा अर्थ उत्तम, चांगले. ‘ऋतू हिरवा’ या गीतात ‘बरवा’ असा शब्द आहे. त्यामुळे निसर्गाशी संबंधितही हा शब्द आहे. म्हणूनही बरवा हा शब्द आमच्या ब्रँडला चपखल बसला. सध्याच्या घडीला स्कीन केअर, बॉडी केअर, हेअर केअर आणि मेकअप अशा चार श्रेणीत आमची उत्पादने आहेत. गाईच्या तुपापासून मेकअप प्रॉडक्टस् हा आमचा यूएसपी आहे. अन्य उत्पादनांमध्ये घरच्या शेतीतून सेंद्रिय गुळाचे उत्पादन आणि विक्रीही आम्ही सुरू केलीय. आमच्या उत्पादनांमध्ये नैसर्गिक उत्पादने प्राधान्यक्रमाने असतात. आजच्या घडीला आमची सुमारे विविध 22 उत्पादने बाजारात आहेत.
साताऱयातील ‘बरवा’ प्रॉडक्शन युनिटमध्ये 7 ते 8 कामगार आहेत, त्यात बहुतांश महिला आहेत. तर साधारण 90 महिला अशा आहेत ज्या या उद्योग साखळीत समाविष्ट आहेत.
या ब्रॅण्डच्या उत्पादनांना महाराष्ट्रासह आसाम, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये चांगली मागणी आहे. अमेरिकेतील ‘पंडित फूड्स’सोबत त्यांचे टायअप आहे. कामाक्षी सांगतात, महिलांसोबत मुले, पुरुष वर्ग हाही आमचा टार्गेट ऑडियन्स आहे. आमचा ब्रँड आता फॅमिली ब्रँड झालाय. मुंबईसारख्या शहरात या उद्योगामध्ये पाय रोवायला आम्हाला मुंबई ग्राहक पंचायतसारख्या संघटनेची मोलाची मदत झाली.
(लेखक एबीपी माझाचे सीनिअर प्रोडय़ूसर-सीनिअर न्यूज अँकर आहेत.)


























































