
वेस्ट इंडिजमध्ये सध्या Caribbean Premier League चा रणसंग्राम सुरू आहे. जगभरातील दर्जेदार खेळाडू या लीगमध्ये आपल्या सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत आहेत. याच खेळाडूंमधील एका खेळाडूच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इमरान ताहिरचं वय जरी 46 असलं तरी, त्याचा जोश मात्र अजूनही तिशीतलाच आहे. त्याच जोशात त्याने आपल्या फिरकीच जाळं असं काही विनलं की, अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्सच्या अर्धा संघ त्याने तंबूत धाडला. इमरान ताहिरच्या अमेझॉन वॉरियर्स संघाने हा सामना 83 धावांनी जिंकला.
अमेझॉन वॉरियर्स संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 211 धावा केल्या होत्या. अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्सला जिंकण्यासाठी 212 धावांची गरज होती. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्सला इमरान ताहिरने आपल्या फिरकीच्या तालावर नाचवलं. त्याला इतर गोलंदाजांची सुद्धा चांगली साथ मिळाली. त्यामुळे अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्सचा संपूर्ण संघ 15.2 षटकांमध्येच 128 धावांमध्ये बाद झाला. इमरान ताहीरने 4 षटकांमध्ये फक्त 21 धावा दिल्या आणि 1 षटक निर्धाव टाकत 5 विकेट घेतल्या. त्याचा हा कारनामा ऐतिहासिक ठरला आहे. कारण इमरान ताहिर आता टी-20 क्रिकेटच्या इतिसाहासात पाच विकेट घेणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम मलावी संघाचा कर्णधार मोअज्जम अली बेग याच्या नावावर होता. मोअज्जम अली बेगने वयाच्या 39 व्या वर्षी कॅमरून संघाविरुद्ध पाच विकेट घेतल्या होत्या.
इमरान ताहिरने फक्त पाच विकेट घेतल्या नाही तर अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. इमरान ताहिर आता टी-20 क्रिकेटमध्ये पाच विकेट घेणारा 40 पेक्षा अधिक वयाचा पहिला कर्णधार ठरला आहे. त्याचबरोबर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पाच विकेट घेणारा तो दुसरा खेळाडू बनला आहे. त्याने आतापर्यंत एकूण पाच वेळा पाच विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. त्यामुळे इमरान ताहीरने आता भुवनेश्वर कुमार, लसिथ मलिंगा, शाकिब अल हसन आणि शाहीद आफरीदी यांची बरोबरी केली आहे. या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर डेव्हिड व्हिसे याचा समावेश आहे. त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये सर्वाधिक 7 विकेट घेतल्या आहेत.































































