
महाराष्ट्र बाईक टॅक्सी धोरण २०२५ च्या अंमलबजावणीतील त्रुटी आणि स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न शिवेसना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील शिंदे यांनी आज विधानपरिषदेत आक्रमकपणे मांडला. केवळ दंडात्मक कारवाईवर न थांबता, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी सरकारकडे केली.
सुनील शिंदे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले की, राज्याच्या नवीन धोरणानुसार केवळ इलेक्ट्रिक बाईकनाच टॅक्सी म्हणून व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी परराज्यात नोंदणी झालेल्या आणि पेट्रोलवर चालणाऱ्या बाईकचा टॅक्सी म्हणून सर्रास वापर सुरू आहे. या अनधिकृत वाहनांमुळे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले जात असून पर्यावरणाच्या हेतूलाही हरताळ फासला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
या व्यवसायात स्थानिक भूमिपुत्रांना डावलले जात असल्याचा गंभीर आरोप शिंदे यांनी केला. “बाईक टॅक्सी क्षेत्रात सध्या परराज्यातील तरुण मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत, तर महाराष्ट्रातील स्थानिक तरुण रोजगारापासून वंचित राहत आहेत, स्थानिकांना जास्त टक्का देण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय आपण घेणार आहेत का?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
























































