क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्राधान्य अॅडलेडलाच, कोरोनाबाधितांची संख्या वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा फटका हिंदुस्थान -ऑस्ट्रेलिया यांच्यामधील अॅडलेड येथील पहिल्या डे-नाईट कसोटीला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियात सोमवारी 21 कोरोनाबाधित सापडले. यामधील बहुतांशी अॅडलेड येथील होते. त्यामुळे सर्व क्रिकेटपटूंना दक्षिण ऑस्ट्रेलियातून हलवण्यात आले आहे. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलिया दोन देशांमधील पहिली कसोटी अॅडलेड येथेच आयोजित करण्यावर ठाम आहे.

कोरोनाबाधित सापडल्यामुळे वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, टास्मानिया, क्वीन्सलँड या शहरांनी दक्षिण ऑस्ट्रेलियाला जोडणाऱया सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जास्त नुकसान होऊ नये यासाठी खेळाडूंनाही तिथून सिडनी येथे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचा झटपट तसेच कसोटी मालिकेसाठीचा चमू आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघातील खेळाडू तेथे सराव करीत होते. टीम पेन, मार्नस लॅबुशेनसह इतर खेळाडूंना विमानामधून सिडनी येथे हलवण्यात आले आहे.

हिंदुस्थानी खेळाडूंचा कसून सराव

हिंदुस्थानच्या क्रिकेटपटूंनी मंगळवारी कसून सराव केला. टीम इंडियाचा संघ सुरुवातीला वन डे व टी-20 सामन्यांच्या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाला टक्कर देणार आहे. पण हिंदुस्थानच्या संघाने कसोटी मालिकेला डोळ्यांसमोर ठेवून यावेळी सराव केला. विराट कोहलीने सराव करतानाचा पह्टो सोशल साइटवर पोस्टही केला. तिन्ही प्रकारांतील खेळाडूंनी मैदानात मेहनत केली हे विशेष.

बीसीसीआयचा एमपीएलसोबत करार

बीसीसीआय व नाईकी यांच्यामधील 15 वर्षांचा करार या वर्षी मोडीत निघाला. त्यामुळे बीसीसीआयला खेळाडूंच्या किटसाठी नव्या स्पॉन्सर्सचा शोध घ्यावा लागला. बीसीसीआयने यावेळी एमपीएल स्पोर्टस् कंपनीशी करार केला असून यावेळी 2020 ते 2023 या कालावधीसाठी हा करार करण्यात आला आहे. हिंदुस्थानचा पुरुषांचा तसेच महिलांचा संघ तसेच 19 वर्षांखालील संघांना एमपीएलची स्पॉन्सर्सशिप लाभली आहे.