
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने रविवारपासून ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध सुरू झालेल्या तीनदिवसीय सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी दमदार शतक झळकावत कसोटी मालिकेआधी आपण फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले. इंडियन्स संघाने पहिल्या दिवसअखेरीस 8 बाद 237 धावा फटकावल्या. कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराने 54 धावांची खेळी साकारत कसोटी मालिकेआधी आत्मविश्वास मिळवला.
इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ व शुभमन गिल या युवा सलामीवीरांना या सराव सामन्यात फलंदाजीचा सराव करता आला नाही. दोघेही शून्यावर बाद झाले. मायकल नेसरने शुभमन गिलला तर जेम्स पॅट्टीनसनने पृथ्वी शॉला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर जॅकसन बर्डने हनुमा विहारीला 15 धावांवर बाद करीत इंडियन्स संघाला तिसरा धक्का दिला.
कुलदीपसोबत महत्त्वाची भागीदारी
अजिंक्य रहाणेने डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवसोबतही महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. दोघांनी 69 धावांची भागीदारी करताना ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघातील गोलंदाजांचे आव्हान समर्थपणे थोपवून लावले. कुलदीप यादवने 15 धावा केल्या. ट्रेव्हीस हेडने त्याला बाद केले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या उमेश यादवने 24 धावांची खेळी केली. मायकल नेसरने त्याला बाद केले. आता अजिंक्य रहाणे 108 धावांवर तर मोहम्मद सिराज शून्यावर खेळत आहे. अजिंक्य रहाणेने आपल्या खेळीत 1 षटकार व 16 चौकारांची बरसात केली.




























































