
ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा पहिला डाव अवघ्या 108 धावांमध्ये गुंडाळणाऱया इंडियन्स संघातील अर्थातच हिंदुस्थानी संघातील वेगवान गोलंदाजांना तीनदिवसीय सराव सामन्याच्या अखेरच्या दिवशी अपयशाचा सामना करावा लागला. बेन मॅकडरमॉट (नाबाद 107 धावा), जॅक विल्डरमुथ (नाबाद 111 धावा), ऍलेक्स कॅरी (58 धावा) यांच्या झुंजार खेळीमुळे 473 धावांचा पाठलाग करणाऱया ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने दुसऱया डावात 4 बाद 307 धावा फटकावल्या. अखेर इंडियन्स व ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यामधील तीन दिवसीय डे-नाइट सराव सामना अनिर्णित राहिला.
इंडियन्स संघाने 4 बाद 386 या धावसंख्येवर दुसरा डाव सोडण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाच्या दुसऱया डावाची सुरुवात निराशाजनक झाली. मोहम्मद शमीने मार्क्स हॅरीसला पाच धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मोहम्मद शमीनेच पुन्हा जो बर्न्सला एक धावेवर पायचीत केले. मोहम्मद सिराजने नीक मॅडीनसनला 14 धावांवर बाद करीत यजमानांना तिसरा धक्का दिला. यामुळे ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाची अवस्था 3 बाद 25 धावा अशी बिकट झाली.
ऍलेक्स कॅरीचे अर्धशतक
ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा डाव बेन मॅकडरमॉट व ऍलेक्स कॅरी या जोडीने सावरला. दोघांनी 117 धावांची दमदार भागीदारी रचली. यष्टिरक्षक ऍलेक्स कॅरीने 111 चेंडूंत सात चौकारांसह 58 धावांची खेळी साकारली. हनुमा विहारीने ऍलेक्स कॅरीला बाद केले. ऑस्ट्रेलिया अ संघाने चौथा विकेट 142 धावसंख्येवर गमावला.
165 धावांची अभेद्य भागीदारी
ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा दुसरा डाव कोसळणार असे वाटत असतानाच बेन मॅकडरमॉट व जॅक विल्डरमुथ या जोडीने शानदार फलंदाजी करताना इंडियन्स संघातील गोलंदाजांचे आव्हान परतवून लावले. दोघांनी 165 धावांची अभेद्य भागीदारी रचली. बेन मॅकडरमॉटने 16 चौकारांसह नाबाद 107 धावांची खेळी केली. जॅक विल्डरमुथने तीन षटकार व 12 चौकारांसह नाबाद 111 धावा फटकावल्या. मोहम्मद शमीने दोन तर मोहम्मद सिराज व हनुमा विहारी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
इंडियन्स पहिला डाव – सर्व बाद 194 धावा
दुसरा डाव – 4 बाद 386 धावा (डाव घोषित)
ऑस्ट्रेलिया अ पहिला डाव – सर्व बाद 108 धावा
दुसरा डाव – 4 बाद 307 धावा























































