IPL 2020 पंजाब बंगळुरूला रोखणार? राहुल-कोहलीमध्ये रंगणार युद्ध

सलामीच्या लढतीत पंच नितीन मेनन यांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबसमोर उद्या होणाऱया लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान असणार आहे. हिंदुस्थानचा भावी कर्णधार म्हणून लोकेश राहुलकडे बघितले जात आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला त्याची किंग्स इलेव्हन पंजाबची ब्रिगेड भिडणार आहे. याप्रसंगी किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सलग दुसऱया विजयापासून रोखणार का, असा प्रश्न तमाम क्रिकेटप्रेमींना पडला आहे. बघूया बुधवारी कोणता संघ बाजी मारतोय ते.

फलंदाजांनी जबाबदारी ओळखून खेळ करायला हवा

किंग्स इलेव्हन पंजाबला पहिल्या लढतीत दिल्ली पॅपिटल्सकडून सुपर ओव्हरमध्ये हार सहन करावी लागली. पंचांनी केलेल्या चुकीचा फटका त्यांना बसला, हे मान्य आहे. पण मयांक अग्रवालवगळता एकाही फलंदाजाने चमकदार फलंदाजी केली नाही, ही बाबही तेवढीच महत्त्वाची आहे. ग्लेन मॅक्सवेल, निकोलस पूरण, करुण नायर, लोकेश राहुल, सरफराज खान या सर्वांनाच अपयशाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे फलंदाजांनी आगामी लढतींत जबाबदारी ओळखून खेळ करायला हवा. ख्रिस गेलऐवजी पहिल्या लढतीत निकोलस पूरणला संधी देण्यात आली होती. आता आगामी लढतींत ख्रिस गेलला संधी देण्यात येते का, हे पाहायला आवडेल.

डेल स्टेन, उमेश यादवचे काय होणार?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिल्या लढतीत विजय मिळवला असला तरी डेल स्टेन व उमेश यादव या वेगवान गोलंदाजांना म्हणावा तसा ठसा उमटवता आलेला नाही. पण दोघेही अनुभवी असल्यामुळे त्यांना संघाबाहेर काढण्यात येईल असे वाटत नाही. पण ख्रिस मॉरीस, इसुरू उडाना, अॅडम झाम्पा हे खेळाडू बेंचवर बसलेले आहेत हे त्यांना विसरून चालणार नाही.

डिव्हिलियर्स, चहल, पडीक्कल, सैनी, शमी यांच्याकडून पुन्हा अपेक्षा

दोन्ही संघांतील काही खेळाडूंनी पहिल्या लढतीत दमदार कामगिरी केली. ए. बी. डिव्हिलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडीक्कल व नवदीप सैनी यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी तर मोहम्मद शमी, रवी बिश्नोई यांनी किंग्स इलेव्हन पंजाबसाठी जबरदस्त प्रदर्शन केले. आता या खेळाडूंकडून पुन्हा एकदा शानदार कामगिरीची अपेक्षा बाळगली जात असेल यात शंका नाही.

  • आजची लढत – किंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम) रात्री 7.30 वाजता
आपली प्रतिक्रिया द्या