
कौटुंबिक कारणामुळे अखेरच्या दोन टी-20 लढतीमधून माघार घेणारा मिचेल स्टार्क पुन्हा ऑस्ट्रेलियन संघाशी जोडला गेला आहे. ऍडलेड येथे 17 डिसेंबरपासून खेळवण्यात येणाऱया हिंदुस्थानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी तो सज्ज झाला आहे. गुलाबी चेंडूने ऍडलेड येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यांमधील मिचेल स्टार्कची कामगिरी उल्लेखनीय आहे. त्याने सात सामन्यांमध्ये 19.23च्या सरासरीने 42 फलंदाज बाद केले आहेत. त्यामुळे त्याचे पुनरागमगन ऑस्ट्रेलियन संघाचा आत्मविश्वास वाढवणारे ठरणार आहे.
हेझलवूडचा थम्प अप
मिचेल स्टार्कचे ऑस्ट्रेलियन संघामध्ये पुनरागमन झाल्यानंतर सहकारी जोश हेझलवूड याने आनंद व्यक्त केला आहे. यावेळी तो म्हणाला, मिचेल स्टार्कने डे-नाईट कसोटी सामन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याच्या समावेशामुळे ऑस्ट्रेलियन संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावेल.
नव्याने सुरुवात करावी लागेल
दरम्यान, झटपट क्रिकेट मालिकेत विराट कोहलीला बाद करणाऱया जोश हेझलवूडला कसोटी मालिकेबाबत विचारले असता तो म्हणाला, विराट कोहलीला वन डे लढतींमध्ये तीन वेळा बाद केले आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत माझ्याकडे ऍडव्हांटेज असेल असे म्हणता येईल, पण वन डे आणि कसोटी हे क्रिकेटचे दोन्ही प्रकार भिन्न आहेत. त्यामुळे दोन्ही खेळाडूंना नव्याने सुरुवात करावी लागणार आहे, असेही त्याने आवर्जून सांगितले.





























































