ईशान किशन-श्रेयस अय्यरला बीसीसीआयचा दणका; वार्षिक करारातून दाखवला बाहेरचा रस्ता

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 2023-24 ची वार्षिक रिटेनर यादी जाहीर केली आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या या खेळाडूंच्या वार्षिक करार यादीत ईशान किशन-श्रेयस अय्यर यांना डच्चू देण्यात आला आहे. बीसीसीआयच्या नियमांचे पालन केले नसल्याने त्यांना दणका देत बीसीसीआयने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यांना या वार्षिक करार यादीत स्थान देण्यात आलेले नाही.

या दोन खेळाडूंना बीसीसीआयने रणजीत खेळण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यांनी बीसीसीआयच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. बीसीसीआयच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना वगळण्यात आले आहे. आता या खेळाडूंची कारकिर्द धोक्यात येण्याची शक्यता आहे. A+ श्रेणीमध्ये 4, A श्रेणीमध्ये 6, B श्रेणीमध्ये 5 आणि C श्रेणीमध्ये 15 खेळाडूंना स्थान मिळाले आहे.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या यादीत A+ श्रेणीमध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. तर A श्रेणीमध्ये आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, लोकेश राहुल, शुबमन गिल आणि हार्दिक पांड्या यांच्या नावाचा समावेश आहे. B श्रेणीमध्ये सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल यांना स्थान मिळाले आहे. निवड समितीने आकाश दीप, विजयकुमार विशक, उमरान मलिक, यश दयाल आणि विद्वथ कवेरप्पा या खेळाडूंसाठी वेगवान गोलंदाजी कराराची शिफारस केली आहे.