आशियाई संघात पाकिस्तानी क्रिकेटपटू नको!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बीसीसीआय’ अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यापासून कायम प्रसिद्धीझोतात असलेले सौरव गांगुली यांनी गुरुवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) जबरदस्त दणका दिला. आशियाई संघात पाकिस्तानी क्रिकेटपटू असतील तर आम्ही खेळणार नाही असा पवित्रा ‘बीसीसीआय’ने घेतल्याने हिंदुस्थानशी घेतलेला पंगा पाकिस्तानला आता महागात पडणार आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) संस्थापक आणि बंगबंधू नावाने प्रसिद्ध असलेले शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्म शताब्दीनिमित्त बांगलादेशमध्ये वर्ल्ड इलेव्हन विरुद्ध आशियाई इलेव्हन संघांमध्ये दोन टी-20 सामन्यांची मालिका खेळविण्यात येणार आहे. ‘आयसीसी’ने आंतरराष्ट्रीय दर्जा दिलेली ही मालिका मार्चमध्ये होणार आहे. या मालिकेसाठी आशियाई संघाची निवड करायची आहे, मात्र या संघात पाकिस्तानी क्रिकेटपटूंना स्थान देऊ नका, अन्यथा आम्ही खेळणार नाही अशी कठोर भूमिका ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा पाय आणखीनच खोलात गेला आहे.

पाकिस्तानकडून कुरापती सुरूच पाकिस्तानकडून हिंदुस्थानमध्ये सारख्या कुरापती सुरूच आहेत. उभय देशांतील संबंध सातत्याने तणावपूर्ण असल्याने हिंदुस्थानने पाकिस्तानशी क्रीडा संबंधही तोडून टाकले आहेत. ‘पीसीबी’चे अध्यक्ष एहसान मणी यांनी नुकतेच पाकिस्तानपेक्षा हिंदुस्थान अधिक असुरक्षित असल्याचे अकलेचे तारे तोडले होते. याचबरोबर पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतिफ यानेही ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुली यांची चौरंगी मालिकेची कल्पना बोगस असल्याची टीका केली होती. त्यामुळे गांगुली यांनी आशियाई संघात पाकिस्तानी खेळाडू नको असा पवित्रा घेतल्याने ‘पीसीबी’ला मोठा धक्का बसला आहे.