
हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाने 2019 सालामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश संपादन केले. वन डे वर्ल्ड कप वगळता इतर सर्व स्पर्धांमध्ये टीम इंडियाने उल्लेखनीय कामगिरी केली. संघाच्या या भरारीत सर्वच खेळाडूंनी मोलाचा वाटा उचलला असला तरी विराट कोहली व रोहित शर्मा या दोघांनी धावांच्या राशी उभारल्यात हेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर दोघांच्या कामगिरीवर टाकलेला हा दृष्टिक्षेप…
दशकातला सर्वोत्तम फलंदाज
विराट कोहली याने गेल्या काही वर्षांमध्ये कर्णधार म्हणून हिंदुस्थानसाठी उल्लेखनीय कामगिरी केली असून याचसोबत त्याने फलंदाज म्हणूनही ठसा उमटवला आहे. विराट कोहलीने गेल्या दहा वर्षांमध्ये सर्व प्रकाराच्या क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घातलाय. पण वन डे क्रिकेटमध्ये त्याने बहुतांशी रेकॉर्ड ब्रेक केलेत. त्याने गेल्या दशकात वन डे क्रिकेटमध्ये 11,125 धावा, 42 शतके झळकविली असून 35 वेळा तो ‘सामनावीर’ तर सात वेळा ‘मालिकावीर’ ठरलाय. 117 झेलही त्याने यादरम्यान टिपले आहेत.
वन डे रँकिंगमध्ये पहिल्या दोन स्थानी
विराट कोहली व रोहित शर्मा या दोघांच्या झंझावाती फलंदाजीमुळे हिंदुस्थानने आयसीसीच्या कसोटी रँकिंगमध्ये पहिले व वन डे रँकिंगमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. तसेच वन डे क्रिकेट रँकिंगमध्ये विराट कोहली 887 रेटिंगसह पहिल्या स्थानावर आणि रोहित शर्मा 873 रेटिंगसह दुसऱया स्थानावर विराजमान आहे.
सलग चार वर्षी नंबर वन
विराट कोहलीने 2016 सालापासून सलग चार वर्षे सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा फटकावत आपणच नंबर वन असल्याचे जगाला दाखवून दिले आहे. त्याने 2016मध्ये 2595 धावा, 2017मध्ये 2818 धावा, 2018मध्ये 2735 आणि 2019 मध्ये 2455 धावा फटकावल्या.
मुंबईकराच्या 2442 धावा
मुंबईकर व टीम इंडियाच्या वन डे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने या वर्षी 2019 सालामध्ये विराट कोहलीच्या तोडीसतोड कामगिरी केलीय. त्याने 2442 धावा फटकावत दुसऱया स्थानावर झेप घेतली. या दरम्यान त्याने एका वर्षात सर्वाधिक धावा करणाऱया सलामीवीराच्या यादीत पहिले स्थानही पटकावले आहे. सनथ जयसूर्या याच्या विक्रमाला त्याने मागे टाकले आहे.

























































