शारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव

शारजाह येथील क्रिकेट स्टेडियममध्ये रविवारी षटकारांसह धावांचाही पाऊस पडला. स्टीवन स्मिथ (50 धावा), संजू सॅमसन (85 धावा) व राहुल तेवतिया (53 धावा) यांच्या झंझावातात किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांचा पालापाचोळा झाला. आयपीएलमधील 226 धावांचा विक्रमी पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने सलग दुसऱ्या विजयाला गवसणी घातली. शारजाहमध्ये आतापर्यंत झालेल्या दोन लढतींमध्ये 62 षटकारांचा वर्षाव झाला असून अबुधाबी व दुबई येथे झालेल्या सात लढतींमध्ये फक्त 55 षटकार मारले गेले आहेत. शारजाह येथील ग्राऊंड इतर दोन स्टेडियमपेक्षा आकाराने लहान असल्यामुळे येथे चेंडू सहजपणे सीमारेषा ओलांडताना दिसत आहे. हा नुसता ट्रेलर असून खरा पिक्चर अजून बाकी आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये नवे विक्रम नोंदवले जातील ही काळ्या दगडावरील रेघ आहे.

या आकडेवारीवर एक नजर

  • राजस्थान रॉयल्सने अखेरच्या पाच षटकांमध्ये 86 धावांची बरसात केली. आयपीएलच्या इतिहासात धावांचा पाठलाग करताना अखेरच्या पाच षटकांमध्ये काढलेल्या या सर्वोत्तम धावा ठरल्या. पण टी-20च्या इतिहासात या धावा दुसऱया क्रमांकाच्या ठरल्या. त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाने 2018 सालामध्ये सेंट लुशिया संघाविरुद्ध अखेरच्या पाच षटकांमध्ये 90 धावांची लूट केली होती. हा विक्रम अजून अबाधित आहे.
  • राहुल तेवतिया याने शेल्डॉन कॉटरेलच्या एका षटकात पाच षटकार मारून ख्रिस गेलच्या आयपीएलमधील विक्रमाची बरोबरी केली. ख्रिस गेलने 2012 साली आरसीबीचे प्रतिनिधित्व करताना राहुल शर्माच्या गोलंदाजीवर एका षटकात पाच षटकार मारले होते.
  • राजस्थान रॉयल्स – किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यामधील लढतीत 449 धावांचा पाऊस पडला. आयपीएलमधील एका लढतीत सर्वाधिक धावा असलेल्या यादीत ही चौथ्या स्थानावरील लढत ठरली.
  • लोकेश राहुल व मयांक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी 183 धावांची भागीदारी रचली. आयपीएलमधील ही सर्वोत्तम तिसरी मोठी भागीदारी ठरली. तसेच टी-20च्या इतिहासातील पराभूत झालेल्या संघावर नजर टाकता दुसरी सर्वोच्च भागीदारी ठरली.

एका षटकात पाच षटकार

स्टीवन स्मिथ व संजू सॅमसन या दोघांनी धडाकेबाज फलंदाजी करीत राजस्थान रॉयल्सला संस्मरणीय विजय मिळवून देण्यासाठी जिवाचे रान केले. पण राहुल तेवतिया यावर पाणी फेरतोय की काय असेच वाटू लागले. त्याने पहिल्या 23 चेंडूंत फक्त 17 धावा केल्या. पण अखेरच्या आठ चेंडूंमध्ये त्याने 36 धावांची फटकेबाजी केली. शेल्डॉन कॉटरेल याच्या एका षटकात त्याने पाच षटकार ठोकून सामन्याला कलाटणी दिली.

आयपीएलमधील धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च धावा

  • राजस्थान रॉयल्स 226 धावा (किंग्स इलेव्हन पंजाब, 2020)
  • राजस्थान रॉयल्स 217 धावा (डेक्कन चार्जर्स, 2008)
  • दिल्ली डेअरडेव्हिल्स 214 धावा (गुजरात लायन्स, 2017)
  • किंग्स इलेव्हन पंजाब 211 धावा (सनरायझर्स हैदराबाद, 2014)
  • सुपर किंग्स 208 धावा (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 2012)
आपली प्रतिक्रिया द्या