
हिंदुस्थानचा माजी विश्वविक्रमादित्य क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपल्या 24 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक विक्रम मोडले आणि अनेक विक्रमांचे इमले चढवले. मात्र परिपूर्ण कारकीर्द घडवणाऱया क्रिकेटच्या या देवदूताला आजही दोन गोष्टींची खंत वाटतेय… सुनील गावसकर यांच्यासोबत आणि वेस्ट इंडीजचे महान खेळाडू विव्हियन रिचर्ड्स यांच्याविरुद्ध मला कधीच मैदानात उतरता आले नाही ही खंत आजही मनात कायम असल्याने सचिन तेंडुलकरने सांगितले.
एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा आणि शंभर आंतरराष्ट्रीय शतकांचा एकमेव धनी असलेल्या सचिन तेंडुलकरने एका मुलाखतीत सांगितले, ‘‘मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल नक्कीच आनंदी आहे. मात्र तरीही कारकिर्दीत दोन गोष्टी करता आल्या नाहीत याची खंत वाटते. पहिली म्हणजे हिंदुस्थानी संघात सुनील गावसकर यांच्याबरोबर खेळायला मिळाले नाही आणि दुसरी म्हणजे बालपणातील माझे हिरो विव्हियन रिचर्ड्स यांच्याविरुद्ध मी मैदनात कधी उतरू शकलो नाही.’’
सचिन तेंडुलकर म्हणाला, ‘‘मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याच्या काही वर्षांपूर्वी सुनील गावसकर निवृत्त झाले होते. मी 1989मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर विव्हियन रिचर्ड्स यांनी 1991ला निवृत्ती घेतली. मात्र दरम्यानच्या काळात आमचा आमना-सामना झालाच नाही. त्यामुळे माझ्या या दोन हिरोंसोबत मैदानात उतरायला मिळाले नाही, ही खंत माझ्या मनात सदैव राहील, असे सचिनने सांगितले.




























































