
हिंदुस्थानात कोरोनाची दुसरी लाट आली आणि याचा फटका इतर क्षेत्रांप्रमाणे आयपीएललाही बसला. यामुळे आयपीएलचा मोसम अर्ध्यावरच सोडून द्यावा लागला. अन् याच कारणामुळे हिंदुस्थानात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांमध्ये आयोजित करण्यात येणाऱया टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या यजमानीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आता बीसीसीआयकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर येत्या 29 मे रोजी बीसीसीआयकडून विशेष सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या यजमानीसोबतच स्थानिक स्पर्धा व आयपीएलच्या उर्वरित मोसमाबाबतही चर्चा करण्यात येणार आहे.
कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय
बीसीसीआयच्या सूत्रांकडून यावेळी सांगण्यात आले की, टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी यूएई हा पर्याय ठेवण्यात आला; पण सध्या तरी टी-20 वर्ल्ड कप हिंदुस्थानातच खेळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहून याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ. यासाठी जून-जुलैपर्यंतची वाट बघितली जाणार आहे, असेही त्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
स्पर्धा, स्पॉन्सर अन् ऑफिशियल पार्टनर्स
कोरोनामुळे मागील मोसमात बहुतांशी स्थानिक स्पर्धांना कात्री लावण्यात आली. यंदा स्थानिक स्पर्धांच्या आयोजनावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तसेच दोन स्पर्धांदरम्यान खेळाडूंना विश्रांती मिळावी यावरही कटाक्ष टाकण्यात येणार आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी केंद्र सरकारकडून सूट मिळावी यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारकडून 10 टक्के सूट देण्यात आली नाही तर बीसीसीआयला 906 कोटींचा तोटा सहन करावा लागू शकतो. बीसीसीआयला यावेळी ऑफिशियल पार्टनर्स व स्टार वाहिनी यांच्याकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. कारण गेल्या मोसमात कोरोनामुळे स्थानिक स्पर्धा व आंतरराष्ट्रीय मालिकांना कात्री मिळाल्यामुळे स्टार वाहिनीलाही मोठय़ा नुकसानीचा सामना करावा लागला आहे.
युनायटेड किंगडमला आयपीएलसाठी पसंती
हिंदुस्थानचा संघ सध्या इंग्लंड दौऱयावर आहे. टीम इंडियाचा संघ येथे सहा कसोटी सामने खेळणार आहे. युनायटेड किंगडम येथेच आयपीएलच्या उर्वरित लढती खेळवण्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करणार आहे. युनायटेड किंगडममधील शासनाकडून स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्यात येत आहे. त्यामुळे आयपीएलमधील फ्रेंचायझींना तिकीट विक्रीद्वारे कमाई करता येणार आहे. याच कारणामुळे बीसीसीआयकडून युनायटेड किंगडमलाच आयपीएलच्या उर्वरित लढतींच्या आयोजनासाठी पहिली पसंती दाखवण्यात आली आहे.





























































