टी-20 वर्ल्ड कपच्या मुख्य संघात मोहम्मद शमी हवा होता, संघनिवडीवर माजी क्रिकेटपटूची खंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या हिंदुस्थानी संघाची ‘बीसीसीआय’ने सोमवारी घोषणा केली. ही स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात होणार असून या स्पर्धेसाठी 15 जणांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. तसेच चार खेळाडू राखीव ठेवले आहेत. यात मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर या क्रिकेटपटूंचा समावेश आहे. मुख्य संघातील एखादा खेळाडू दुर्दैवाने जायबंदी झाल्यास या राखीव खेळाडूंपैकी एकाचा संघात समावेश केला जाईल. मोहम्मद शमीसारख्या वेगवान गोलंदाजाला संघाबाहेर ठेवत राखीव क्रिकेटपटू बनवणे हे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याला फारसं पसंत पडलेलं नाही. मुख्य संघातील एक फिरकीपटू कमी करून त्याजागी शमी याला संघात घ्यायला हवं होतं असं मत आकाश चोप्रा याने व्यक्त केलं आहे.

T20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे. दुखापतीतून सावरलेल्या जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल या वेगवान जोडगोळीला संघात स्थान देण्यात आलं आहे. उपकर्णधार लोकेश राहुल हा कर्णधार रोहित शर्माच्या साथीने सलामीला उतरलेला पाहायला मिळेल. माजी कर्णधार विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल. यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. हार्दिक पांड्या, दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांना अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. रविचंद्रन अश्विन व यजुवेंद्र चहल यांच्यावर फिरकी गोलंदाजीची, तर जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग यांच्यावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल. 16 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतला हिंदुस्थानी संघाचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना 23 ऑक्टोबरला होणार आहे.

टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेला हिंदुस्थानी संघ
रोहित शर्मा (कर्णधार),
लोकेश राहुल (उपकर्णधार),
विराट कोहली,
सूर्यकुमार यादव,
दीपक हुड्डा,
रिषभ पंत,
दिनेश कार्तिक,
हार्दिक पंडय़ा,
रविचंद्रन अश्विन,
युझवेंद्र चहल,
अक्षर पटेल,
जसप्रीत बुमराह,
भुवनेश्वर कुमार,
हर्षल पटेल,
अर्शदीप सिंग.

राखीव –
मोहम्मद शमी,
श्रेयस अय्यर,
रवी बिश्नोई,
दीपक चहर.