तिन्ही प्रकारांत खेळत राहणार! विराट कोहलीचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कसोटी, वन डे आणि टी-20 हे क्रिकेटमधील तीन प्रकार आणि भरगच्च वेळापत्रक यामुळे क्रिकेटपटूंच्या कारकीर्दीवर परिणाम होऊ लागलाय. याच पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आपले मत व्यक्त करताना म्हटले की, पुढील तीन वर्षे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत खेळत राहीन. त्यापुढे क्रिकेटच्या एका प्रकारामधून निवृत्त होऊ शकतो.

आठ वर्षे अन् 300 दिवस

विराट कोहली पुढे म्हणाला, गेली आठ वर्षे अन् वर्षातील 300 दिवस सातत्याने क्रिकेट खेळतोय. यामध्ये प्रवास व सरावाचाही समावेश आहे. वर्कलोड सातत्याने जाणवतोय.

म्हणून खेळाडू ब्रेक घेतात

आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना क्षणाक्षणाला दबावाचा सामना करावा लागतो. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत खेळत असलेल्या क्रिकेटपटूंना विश्रांतीची गरज असते. त्यामुळे ते ब्रेक घेतात, असेही विराट कोहली स्पष्टपणे म्हणाला.

तीन महत्त्वाच्या स्पर्धा

हिंदुस्थानचा संघ 21 फेब्रुवारीपासून न्यूझीलंडशी दोन हात करणार आहे तो दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी. पण पुढील तीन वर्षांमध्ये आयसीसीच्या तीन महत्त्वाच्या स्पर्धा होणार आहेत. यामध्ये दोन टी-20 वर्ल्ड कप व एक वन डे वर्ल्ड कपचा समावेश आहे. या तिन्ही स्पर्धांमध्ये विराट कोहलीची खेळण्याची इच्छा आहे.

इशांत, पृथ्वी अंतिम संघात

हिंदुस्थानी संघाने बुधवारी कसून सराव केला. याप्रसंगी विराट कोहलीने इशांत शर्मा व पृथ्वी शॉ या दोन्ही खेळाडूंना अंतिम अकरामध्ये स्थान मिळण्याचे संकेत दिले. तसेच हनुमा विहारीला सहाव्या स्थानावर खेळवण्यात येईल असेही त्याच्याकडून सांगण्यात आले. याचाच अर्थ त्याला अष्टपैलू कामगिरी करावी लागणार हेही निश्चित झाले. जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा व मोहम्मद शमी हे तीन वेगवान गोलंदाज अंतिम अकरामध्ये असतील. रविचंद्रन अश्विन व रवींद्र जाडेजा यांच्यापैकी कोणत्या फिरकीवीराला अंतिम संघात स्थान मिळतेय हे पाहणे रंजक ठरेल. दरम्यान, नील वॅगनरचा पर्यायी खेळाडू म्हणून न्यूझीलंड बोर्डाकडून मॅट हेन्रीची निवड करण्यात आली आहे.