
सामना ऑनलाईन, नॉटिंगहॅम
एक वर्षानंतर ऑस्ट्रेलियन संघात कमबॅक करणाऱ्या स्टीवन स्मिथच्या 73 धावा,आठव्या क्रमाकांवर फलंदाजी करणाऱ्या नॅथन कुल्टर नाईलने तडकावलेल्या 92 धावा, डावखुरा तेज गोलंदाज मिचेल स्टार्कने टिपलेले पाच बळी व पॅट कमिन्सने दोन फलंदाज बाद करीत त्याला दिलेली उत्तम साथ याच जोरावर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने गुरुवारी वेस्ट इंडीजला 15 धावांनी पराभूत करीत वर्ल्ड कपमध्ये सलग दुसऱ्या विजयाला गवसणी घातली. नॅथन कुल्टर नाईलची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
‘ते’ खेळले म्हणून…

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची अतिशय गचाळ सुरुवात झाली. विंडीजच्या तिखट गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाची ऍरोन फिंच (6), डेव्हिड वॉर्नर (3), उस्मान ख्वाजा (13), ग्लेन मॅक्सवेल (0) व मार्कस स्टोयनीस ही आघाडीची फळी उद्ध्वस्त झाली. ऑस्ट्रेलियाचा डाव 5 बाद 79 असा संकटात सापडलेला असताना अनुभवी स्टीव्हन स्मिथने आक्रमकतेचा मुरड घालत खेळपट्टीवर उभे राहण्याला पसंती दिली. त्याने ऍलेक्स कॅरीच्या (45) साथीने सहाव्या गडय़ासाठी 68 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाची पडझड थांबविली. 55 चेंडूत 7 चौकार लगावणाऱ्या कॅरीला रसेलने यष्टीमागे झेलबाद करून ही जोडी फोडली. त्याच्या जागेवर आलेल्या नॅथन कुल्टर नाईलने अनपेक्षितपणे विंडीजच्या गोलंदाजीवर हल्ला चढविला. त्याने व स्मिथने सातव्या गडय़ासाठी शतकी भागीदारी करून ऑस्ट्रेलियाच्या डावाला खऱ्या अर्थाने आकार दिला. 103 चेंडूत 7 चौकारांसह 73 धावांची खेळी करून स्मिथ थॉमसच्या गोलंदाजीवर शेल्डॉनकडे झेल देऊन माघारी परतला. नॅथन कुल्टर नाईलने 60 चेंडूंच्या वादळी खेळीत 8 सणसणीत चौकारांसह 4 टोलेजंग षटकार ठोकले म्हणून कांगारूंना समाधानकारक धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.
होप, होल्डरची झुंज
वेस्ट इंडीजच्या विजयासाठी शेई होप, निकोलस पूरण, शिमरोन हेथमायर व जेसन होल्डर यांनी शर्थीचे प्रयत्न केले. शेई होपने 68 धावांची, निकोलन पूरनने 40 धावांची, शिमरोन हेथमायरने 21 धावांची आणि जेसन होल्डरने 51 धावांची खेळी साकारली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 46 धावांच्या मोबदल्यात ख्रिस गेल, जेसन होल्डर, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रेथवेट व शेल्डॉन कॉटरेल यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पॅट कमिन्सने दोन फलंदाज बाद केले.
धावफलक
ऑस्ट्रेलिया स्टीव्हन स्मिथ झे. कॉटरेल गो. थॉमस 73, मार्कस स्टोयनीस झे. पूरन गो. होल्डर 19, ऍलेक्स कॅरी झे. होप गो. रसेल 45, नॅथन कुल्टर नाईल झे. होल्डर गो. ब्रेथवेट 92. अवांतर -27, एकूण-49 षटकांत 288 धावा. गोलंदाजी-ओशेन थॉमस 10-0-63-2, शेल्डॉन कॉटरेल 9-0-56-2, आंद्रे रसेल 8-0-41-2, कार्लोस ब्रेथवेट 10-0-67-3.
वेस्ट इंडीज-शेई होप झे. ख्वाजा गो. कमिन्स 68, जेसन होल्डर झे. झाम्पा गो. स्टार्क 51. अवांतर-20, एकूण -50 षटकांत 9 बाद 273 धावा. गोलंदाजी-मिचेल स्टार्क 10-1-46-5, पॅट कमिन्स 10-3-41-2.




























































