घणसोली मध्ये क्रिकेट खेळताना क्रिकेटपटूचा दुर्दैवी अंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी मुंबई

घणसोली येथे क्रिकेटचा सामना सुरू असताना छातीत कळ आल्याने संदीप म्हात्रे हा युवा खेळाडू घरी गेला. घरी जाताना हृदय विकाराच्या झटक्याने या तरुण खेळाडूचा दुर्दैवी अंत झाला. रविवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली.

घणसोली गावातील एक नामवंत क्रिकेट खेळाडू  संदीप चंद्रकांत म्हात्रे, (वय 36 वर्षे) यांचे घणसोली क्रिकेट स्पर्धेत सामन्यात गोलंदाजी केल्यानंतर छातीत दुखायला लागले म्हणून घरी जात असताना वाटेतच मृत्यू झाला.

संदीप हा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जायचा. शालेय जीवनापासून संदीप ने आपले नाव क्रिकेट क्षेत्रात गाजवायला सुरवात केली होती. नवी मुंबई  महापौर चषक क्रिकेट स्पर्धा दहावीला असताना खऱ्या अर्थाने संदीप ने गाजवले आणि त्यावेळी शेतकरी शिक्षण संस्थेचे नाव संदीपच्या जादुई गोलंदाजीने अवघ्या शहरात आपले वेगळे स्थान तयार केले होते.

त्यानंतर संदीपने स्थानिक संघातून खेळताना, घणसोली संघातर्फे खेळताना घणसोली गावचे नाव नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये गाजवले. गजानन क्रिकेट संघ (म्हात्रे आळी) या संघाच्या अनेक विजयामध्ये संदीपचा सिंहाचा वाटा होता. अनेक स्पर्धेत सर्वोत्तम गोलंदाज म्हणून संदीपचा गौरव करण्यात आला होता. संदीप याची पंचक्रोशीत अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जायचा  प्रत्येक संघातील खेळाडूंशी संदीप चे मैत्रीपूर्ण संबंध होते. तसेच टेनिस क्रिकेट मध्ये मागील एक वर्षांमध्ये  तरुण वयात मृत्यू होण्याची ही चौथी घटना आहे.