
पाणी पिण्याचा बहाणा करत रेकी करून घरातील साहित्य चोरणाऱ्या महिला टोळीला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दिव्या काळे, सीमा, अर्चना काळे आणि अश्विनी पवार अशी त्यांची नावे आहेत. त्या चौघींना अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गेल्या आठवडय़ात दिव्या ही मुलासोबत अंधेरीच्या एमआयडीसी परिसरात आली होती. पाणी मागण्याचा बहाणा करून तिने एका घरात चोरी केली. चोरी करताना तिला रंगेहाथ पकडून कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. एमआयडीसी पोलिसांनी तिला अटक केली. शुक्रवारी तिला न्यायालयात हजर केले जाणार होते तेव्हा तिने संधीचा फायदा घेऊन पोलीस ठाण्यातून पळ काढला.
वरिष्ठ निरीक्षक रवींद्र वाणी यांच्या पथकातील अधिकाऱयाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांचे पथक संभाजीनगर येथे गेले. तेथून पोलिसांनी दिव्याला ताब्यात घेऊन अटक केली. दिव्याच्या चौकशीत सीमा, अर्चना आणि अश्विनीचे नाव समोर आले. त्या तिघींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर त्या चौघींना मुंबईत आणण्यात आले. त्या चौघींकडून पोलिसांनी एक मोबाईल हस्तगत केला आहे. ही टोळी मुंबईतील झोपडपट्टी परिसरात येते. घरात एकटय़ा महिला दिसल्यावर त्यांच्याकडे पाणी मागितले जाते. त्यानंतर त्या रेकी करतात. पाणी आणण्याचा बहाणा करून ते घरातील साहित्य घेऊन पळ काढतात अशी त्यांची गुह्याची पद्धत आहे.
तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल
प्रेमप्रकरणातून तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी प्रियकराविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार महिला ही मृत तरुणीची आई असून ती घाटकोपर परिसरात कुटुंबीयांसोबत राहते. मृत तरुणी ही अंधेरी येथे एका खासगी पंपनीत काम करत होती. तिथे तिची एकाशी ओळख झाली होती. सहा महिन्यांपूर्वी मृत तरुणीने अचानक कामाचा राजीनामा दिला होता. तेव्हा तिच्या आईने तिला राजीनामा का दिला, अशी विचारणा केली. तिने तेव्हा उडवाउडवीची उत्तरे दिली होती. त्यानंतर तिची मानसिक अवस्था ठीक नव्हती. तिच्या कार्यालयात एक तरुण काम करत होता. प्रेम संबंधाची माहिती तरुणीच्या घरच्यांना माहीत होती. तसेच त्या तरुणाचे कार्यालयातील काही जणींशी प्रेम संबंध असल्याची माहिती समजल्याने तिला धक्काच बसला. तरुणीने त्याला जाबदेखील विचारला होता. त्यावरून त्यांच्यात भांडण होत होती. काही दिवसांपूर्वी त्याने मृत तरुणीशी संबंधदेखील तोडले होते. त्यानंतर तो तरुण तिला वारंवार मानसिक त्रास देत होता. या त्रासाला पंटाळून तरुणीने गेल्या आठवडय़ात राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तरुणीच्या आईला घरी पर्समध्ये चिठ्ठी आढळून आली.


























































