सायबर चोरट्यानेच सांगितले, ओटीपी सांगू नका…ऐनीडेस्क अ‍ॅपद्वारे केली चार लाखांची फसवणूक

सायबर चोरटे फसवणूकीसाठी कोणतीही शक्कल लढवू शकतात. त्याची प्रचिती तरूणाला आली असून सायबर चोरट्याने ऐनीडेस्क अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगून तब्बल 4 लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे.  याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारकाविरुध्द हडपसर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत साहेबराव राऊत (54, रा.हडपसर) यांनी  हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

श्रीकांत  हे बीएसएनएल कंपनीत  अंदमान निकोबर येथे काम करतात. ते सुट्टी घेऊन कुटूंबियांना भेटण्यासाठी हडपसरला आले होते. पुणे स्टेशनवरुन ओला कॅब बुक करून घरी आल्यावर पेमेंट करताना चुकून त्यांच्याकडून डेबीट कार्ड पेमेंटचे बटण दाबले गेले. त्यानंतर त्यांनी ते रद्द करुन कॅब चालकाला रोकड दिल्यानंतरही श्रीकांतला मेसेज आला. त्यांना डेबीट कार्डमधून गेलेले 299 रुपये कंपनीकडून परत देणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.  श्रीकांतने गुगलवरुन हेल्पलाईन नंबरवर कॉल केला. मात्र, सायबर चोरट्याने त्यांना एनी डेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून कोणासही ओटीपी सांगू नका असे सांगितले. यानंतर त्यांच्या खात्यात 299 रुपये जमा झाले.

सायबर चोरट्याने श्रीकांतच्या बँकेची सर्व माहिती काढून घेत स्वत:चा मोबाईल नंबर त्यांच्या बँक खात्यास जोडला. यानंतर परस्पर 14 लाख 79 हजार रुपयांचे डिजीटल लोन त्यांच्या बँकेतून मंजूर करुन घेतले. त्यातील 3 लाख 94 हजार रुपयांची रक्कम सायबर चोरट्याने तातडीने स्वत:च्या खात्यात वर्ग करुन घेतली. यासंदर्भातील एकही मेसेज फिर्यादीला आला नाही. दरम्यान दोन दिवसांनी श्रीकांत बँकेत पासबुक भरण्यासाठी गेले असता, त्यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी बँक व्यवस्थापकाशी संपर्क साधून उर्वरीत रक्कम सायबर भामटयाच्या खात्यात वर्ग होण्यापासून थांबवली. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विश्वास डगळे करत आहेत. अशाप्रकारे नागरिकांनी विश्वास न ठेवता कोणतेही अ‍ॅप डाउनलोड न करण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.