लातूरात मुलाने केला वडीलांवर चाकू हल्ला, खूनाचा गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर शहरात आईला मारहाण करतात म्हणून मुलाने वडीलांनी चाकू हल्ला केला. यात वडीलांच्या मृत्यू झाला असून आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवरील आंबा हनुमानाच्या पाठीमागे असलेल्या रेणुकानगरात भागात ही धक्कादायक घटना घडली. आहे. रेणुकनगरात सोमनाथ मधुकर क्षीरसागर (48) वर्षे यांचे कुटुंब भाड्याच्या घरात राहते. 3 जूनच्या रात्री साडे नऊच्या सुमारास सोमनाथ क्षीरसागर व त्याची पत्नी मंगल क्षीरसागर यांच्यात भांडण सुरू झाले. सोमनाथ आपल्या पत्नीला मारहाण करीत होता. हे त्याचा मुलगा रोहित सोमनाथ क्षीरसागर (23) याला सहन झाले नाही. बाप आपल्या आईला सतत मारहाण करून त्रास देतोय म्हणून रोहितने घरातील चाकू काढून बापाच्या पोटात व छातीवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या सोमनाथ यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी मंगल क्षीरसागर हिने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रोहित क्षीरसागर याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तपास पोलीस उपनिरीक्षक कराड करत आहेत.