देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार कमी; अनिल देशमुख यांची माहिती

देशातील गुन्ह्यांचा दर (क्राईम रेट) वाढत असला तरी महाराष्ट्रातील गुन्ह्यांचा दर कमी आहे. महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांचा दरही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा कमी आहे. महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र 22 व्या क्रमांकावर आहे. गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या दरातही महाराष्ट्रात वाढ होत आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्रापेक्षा अधिक गुन्हे दर केरळ, तेलंगणा, मध्य प्रदेश, हरयाणा, राजस्थानचा आहे. तसेच राज्याचा गुन्हेगारांना शिक्षा होण्याचा दरही वाढला आहे. 2018 मध्ये गुन्हेगारांना शिक्षा होण्याचा दर 41. 41 टक्के होता. हाच दर 2019 मध्ये 49 टक्के झाला आहे. कर्नाटकमध्ये हा दर 36. 6 टक्के, मध्य प्रदेशात 47 टक्के, तेलंगणामध्ये 42.4 टक्के आहे. गुन्हेगारांना शिक्षा बजावण्यात महाराष्ट्र राज्याचा 11वा क्रमांक आहे, अशी माहितीही अनिल देशमुख यांनी दिली.

परिचितांकडून बलात्कार
महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांचे प्रमाण महाराष्ट्रात कमी आहे. 2019 मधील आकडेवारीनुसार राजस्थानमध्ये महिलांवरील बलात्काराचे 5 हजार 997 गुन्हे नोंदवण्यात आले तर उत्तर प्रदेशात 3 हजार 65 बलात्काराचे गुन्हे, मध्य प्रदेशात 2 हजार 485 तर महाराष्ट्रात 2 हजार 299 गुन्हे नोंदवण्यात आले. यामध्ये सर्वाधिक गुन्हेगार हे परिचित, नातेवाईक, मित्र व शेजारी आहेत, तर 25 टक्के गुन्हेगार अनोळखी आहेत. या गुन्ह्यांमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत एक लाख महिलांच्या लोकसंख्येच्या मागे राज्य 13 व्या क्रमांकावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या