गुन्हे वृत्त- मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 मंदिरात दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कांदिवली पोलिसांनी अटक केली. अरमान ऊर्फ अल्ताफ नजीर शेख असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेने दोन गुन्ह्यांची उकल करण्यात कांदिवली पोलिसांना यश आले आहे. कांदिवली पश्चिमच्या एम. जी. रोड येथे एक मंदिर आहे. गेल्या महिन्यात मंदिराची दानपेटी अज्ञात व्यक्तीने फोडली. दानपेटी फोडून त्यातील पैसे चोरून नेले. हा प्रकार एका जणाच्या लक्षात आला. त्याने कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. कांदिवली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक करण सोनकवडे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक शेखर शिंदे, उपनिरीक्षक नितीन साटम, पोलीस हवालदार प्रवीण जोपले, राजेंद्र गौतम, पोलीस शिपाई जोगलपुरे, वाघमारे, नादकर, राणे आदींच्या पथकाने तपास करून चोरट्याला अटक केली.

दलाल महिलेच्या ताब्यातून मुलींची सुटका
दोघा अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसाय करण्यासाठी एका दलाल महिलेचे प्रयत्न सुरू होते. तिने तशी फिल्डिंगदेखील लावली होती. परंतु वेळीच ही माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनीट-९ने त्या दोघींची सुटका केली. जयश्री श्रीवास्तव नावाची महिला नेपाळच्या दोन अल्पवयीन मुलींकरवी वेश्याव्यवसाय करून घेण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी तिने ग्राहकदेखील शोधले असून ती मुलींना घेऊन अंधेरी पश्चिमेकडील एके ठिकाणी येणार असल्याची खबर युनिट ९ला मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-९च्या पथकाने त्या ठिकाणी आधीच सापळा रचून जयश्री त्या दोघा १६ वर्षांच्या मुलींना घेऊन येताच त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी जयश्री श्रीवास्तव हिच्या विरोधात डी.एन. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघा अल्पवयीन मुलींची सुटका केली.