
जालना शहरात गुन्हेगारीने अक्षरशः हैदोस घातला असून, धारदार शस्त्राने तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना ६ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री घडली आहे. या रक्तरंजित घटनेमुळे जालना शहर पुन्हा एकदा हादरले असून कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
काल रात्री सुमारे दोनच्या सुमारास जालन्यातील मंगळ बाजार चौकात ही थरारक घटना घडली. शाहेद सगीर शेख (रा. जालना) या तरुणावर जुन्या वादातून राहील कलीम शेख याने धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या या प्राणघातक हल्ल्यात शाहेद गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
मयत शाहेद शेख यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी राहील कलीम शेख (रा. मंगळ बाजार, जालना) याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, जालना शहरात खून, मारहाण, टोळीयुद्ध, दहशत अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याची तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. मध्यरात्री भरवस्तीत घडलेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
जालन्यात वाढणार्या गुन्हेगारीवर पोलिस प्रशासन कठोर कारवाई करणार की शहर असेच रक्तरंजित घटनांचे साक्षीदार राहणार? असा थेट सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.





























































