IPL 2024 – मॅक्सवेल काय करत होता…?

आयपीएलच्या दहा सामन्यांत फक्त 52 धावा आणि त्यात चारवेळा भोपळा. ही आकडेवारी आहे ग्लेन मॅक्सवेलची. आपल्या भन्नाट खेळामुळे आणि नशीबाच्या जोरावर बंगळुरू प्ले ऑफमध्ये पोहोचला खरा, पण त्यांना पुन्हा अपयश आले. गेल्या 16 वर्षांपासून अपुरे असलेले जेतेपदाचे स्वप्न 17 व्या वर्षीही अपुरेच राहिले.

बुधवारी ग्लेन मॅक्सवेलने पुन्हा माती खाल्ली. पूर्ण स्पर्धेत अपयशी ठरलेल्या मॅक्सवेलकडून फक्त एका खेळीची अपेक्षा होती. बंगळुरूची 3 बाद 97 अशी स्थिती असताना मॅक्सवेलला मैदानात उभे राहण्याची आवश्यकता होती. पण त्याने पहिल्याच चेंडूवर आपली विकेट फेकत बंगळुरूची अवस्था आणखी बिकट केली. त्याच्या अपयशामुळे बंगळुरूला राजस्थानसमोर मोठी आणि आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. मॅक्सवेलच्या या कामगिरीवर अनेक क्रिकेटपटूंनी जोरदार टीका केली. इतक्या महत्त्वाच्या सामन्यातही त्याचे बेदरकार आणि निष्काळजी खेळणे संघाला फार महागात पडले. त्याचा फटका पाहून मॅक्सवेल नेमपं काय करत होता असा प्रश्न इरफान पठाण नव्हे तर आरसीबीच्या चाहत्यांना पडला.