
परदेशात सहज मिळणारी लिकर चॉकलेट मुंबईत छुप्या मार्गाने विकली जात असल्याचे समोर आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने 31 डिसेंबरच्या अनुषंगाने क्रॉफर्ड मार्केट येथे कारवाई करून डय़ुटी फ्रीच्या नावाखाली आणलेली 16 हजार रुपयांची स्कॉचमिश्रित लिकर चॉकलेट जप्त केली आहेत. यंदाच्या वर्षातील ही अशा प्रकारची पहिलीच कारवाई आहे.
डय़ुटी फ्रीच्या नावाखाली आणलेली लिकर चॉकलेट क्रॉफर्ड मार्केटला मिळत असल्याची माहिती उत्पादन शुल्क मुंबई शहरच्या अधिकाऱयांना मिळाली. मुंबई शहरचे अधीक्षक सी. बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विनय शिर्के यांच्या पथकाने सापळा रचून एका चॉकलेटच्या दुकानात छापा टाकून 16 हजार रुपये किमतीची अनेक परदेशी ब्रॅण्डच्या स्कॉचमिश्रित असलेली लिकर चॉकलेट जप्त केली आहेत. चॉकलेटची विक्री करणाऱया एकावर कारवाई केली.
परदेशात गेलेल्या एकाने ती चॉकलेट व्यापाऱयाला दिली होती. ती चॉकलेट 2 हजार रुपयांना विकण्यात येणार होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे. परदेशातून डय़ुटी फ्रीच्या नावाखाली ही चॉकलेट आणली जातात. नियमानुसार अशा प्रकारची चॉकलेटची विक्री करता येत नाही. या चॉकलेटच्या विक्रीमागे अर्थगणित दडले असल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकारची जर कोणी चॉकलेट विक्री करत असल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे शिर्के यांनी सांगितले.
परदेशात लिकर चॉकलेटचा ट्रेंड आहे. दारूची मात्रा कमी असल्याने अशी चॉकलेट तरुण मंडळी पार्टीत खातात. चॉकलेटच्या मध्यभागी 5-7 एमएल लिकर असते. पाचपेक्षा जास्त चॉकलेट त्रासदायक ठरू शकतात.


























































