
सामना प्रतिनिधी । श्रीगोंदा
श्रीगोंदे तालुक्यातील सोमवारी दिवसभर उष्णतेचा पारा जास्त असल्याने पेडगाव येथील रहिवासी चंद्रकांत राऊत यांचे संध्याकाळी श्रीगोंदे येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. डॉक्टरांच्या प्राथमिक निरीक्षणात चंद्रकांतचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.
तालुक्यातील पेडगाव येथील चंद्रकांत राऊत हे सी.आर.पी.एफ.मध्ये कार्यरत होते. त्यांनी साधारण ११-१२ वर्षांची सेवा केली आहे. मात्र,काही तांत्रिक अडचणीमुळे गेल्या ६ वर्षांपासून चंद्रकांत पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर झाले नाहीत. दरम्यान आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्यासाठी हा जवान अक्षरशः लाईट पोलचे खड्डे खंणत होता. सोमवारी भर उन्हात आपले नियोजित काम आटोपून, घरी आल्यावर अचानक त्यांच्या पोटात व छातीत जळजळ होऊ लागल्याने , .त्यांना लगेच श्रीगोंदे येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मंगळवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. तसेच दुपारी पेडगाव येथे भीमा नदीतीरी शोकाकुल वातावरणात चंद्रकांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले.


























































