बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी CRPFचे 30 हजार जवान

बिहार विधानसभा निवडणूक काळातील शांततेसाठी केंद्राने राज्यात 30 हजार केंद्रीय राखीव बलांचे जवान तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारमधील बाहुबली उमेदवारांची गुंडगिरी रोखण्यासाठी हा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. बिहारची ही निवडणूक तीन टप्प्यांत पार पडणार आहे. 243 जागांसाठी होणारी हि निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांत आयोजित करण्यात आली आहे. या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 10 नोव्हेंबर 2020 रोजी होणार आहे.

बिहार विधानसभा निवडणूक काळात राज्यात रेल्वे सुरक्षा बल आणि केंद्रीय राखीव पोलीस बलांच्या 300 तुकडय़ा म्हणजे 30 हजार जवान तैनात करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक शांततेने पार पाडण्यासाठी सर्व सहकार्य केंद्र बिहार सरकारला करणार आहे. सुरक्षा उपायांबरोबरच कोविड-19 प्रतिबंधक उपाय निवडणुकीदरम्यान राबवण्याचे निर्देशही केंद्राने राज्य सरकारला दिले आहेत.

अशी असेल जवानांची  दलनिहाय तैनाती

केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या 80 कंपन्या, सशस्त्र सीमा बलाच्या 70, सीमा सुरक्षा बलाच्या 55, केंद्रीय राखीव बलाच्या 50, इंडो -तिबेटन पोलीस बलाच्या 30 तर रेल्वे सुरक्षा बलाच्या 15 कंपन्या बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यातील कायदा -सुव्यवस्थेच्या रक्षणाची कामगिरी पार पाडणार आहेत. एका कंपनीत 100 जवानांचा समावेश असतो. या तैनातीसाठी देशांच्या सीमांवर असलेल्या केंद्रीय सुरक्षा बलाच्या काही तुकडय़ा काढून बिहारला पाठवण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत.

जदयू 104, भाजपा 100

बिहार विधानसभेसाठी  एनडीएचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. एकूण 243 जागांपैकी जदयू 104 आणि भाजप 100 जागांवर उमेदवार उभे करील. तर चिराग पासवान यांच्या ‘लोजपा’ला 30, जीतनराम मांझी यांच्या पक्षाला चार, तर उपेंद्र कुशवाह यांच्या ‘रालोसपा’ला पाच जागा सोडण्यात आल्या आहेत. चिराग पासवान एनडीएतून फुटू नये यासाठी भाजपने आपल्या कोटय़ातील काही जागा लोजपाला दिल्याचे सांगण्यात येते.

आपली प्रतिक्रिया द्या