
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील कोसळलेल्या ‘हिमालय’ ब्रीजच्या ठिकाणी पालिकेतर्फे लवकरच नवा पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाचा संपूर्ण आराखडा तयार असून मंजुरीसाठी गेल्याच आठवडय़ात तो राज्याच्या पुरातत्व खात्याकडे पाठवण्यात आला आहे. पुरातत्व खात्याच्या मंजुरीनंतर तातडीने टेंडर प्रक्रिया राबवून येत्या दोन ते तीन महिन्यांत पुलाचे बांधकाम सुरू करणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील ‘हिमालय’ पूल 14 मार्च 2019 रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांना नाहक जीव गमवावा लागला. शिवाय या दुर्घटनेत 32 जण गंभीर जखमीदेखील झाले होते. विशेष म्हणजे संबंधित पुलाचा स्ट्रक्चरल ऑडिटर डी. डी. देसाई याने ब्रीज ‘गुड कंडिशन’मध्ये असल्याचा अहवाल देऊनही हा ब्रीज कोसळला. त्यामुळे संबंधित देसाई स्ट्रक्चरल ऑडिटरवर कारवाई करून पालिकेकडून मुंबईतील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती आणि अतिधोकादायक पुलांची नव्याने उभारणी करण्यात येत आहे. यामध्ये सात जणांचा बळी घेणारा ‘हिमालय’ पूल पालिका कधी बांधणार असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून लवकरच या पुलांचे बांधकाम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
वर्षभरानंतर प्रतीक्षा संपणार
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळच्या ‘हिमालय’ पादचारी पुलावरून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी जात असत. मात्र हा पूल कोसळल्यानंतर गेल्या वर्षभर प्रवाशांना सिग्नल यंत्रणेजवळ केलेल्या झेब्रा क्रॉसिंगचा आधार घेत ये-जा करावी लागत आहे. किंवा 200 मीटर अंतरावर असलेल्या सबवेचा आधार घ्यावा लागत आहे.
…म्हणूनच हवीय परवानगी
हिमालय पूल टाइम्सची इमारत आणि अंजुमन-ए-इस्लाम या हेरिटेज वास्तूंच्या जवळच आहे. त्यामुळे पूल उभारणीचा या वास्तूंना कोणताही धोका होणार नाही याची काळजी कंत्राटदाराला घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच राज्याच्या पुरातत्व कास्तू समितीची मंजुरी घ्यावी लागणार आहे. यासाठी पालिकेच्या पूल विभागाने गेल्या आठवडय़ात पुरातत्व विभागाकडे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यवाही केली आहे. याचबरोबर पुलासाठी तीन आराखडे तयार करण्यात आले आहेत. यापैकी पुरातत्व विभागाने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र आणि मंजूर केलेल्या आराखडय़ानुसार पुलाचे बांधकाम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

























































