मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारत परिसराचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. हे स्थानक जागतिक दर्जाचे बनविण्याची योजना इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने मध्य रेल्वेसमोर सादर केली आहे.

मध्य रेल्वेचे हेडक्वॉर्टर असलेली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही इमारत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. गॉथिक शैलीतील ही इमारत जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. मुख्य इमारतीला तसेच तिच्या बाजूच्या हेरिटेज इमारतींना कोणताही धक्का न लावता इतर सर्व इमारती या योजनेत हटविण्यात येणार आहेत. सीएसएमटीच्या मागच्या बाजूचा टॅक्सी स्टँड हटविण्यात येणार आहे. तसेच ‘पीआरएस’देखील हटविण्यात येणार असून येथे पादचारी लोकांसाठी ‘पेडेस्ट्रीयन प्लाझा’ तयार करण्यात येणार आहे. टॅक्सी जेथून बाहेर पडते तेथील इमारती हटवून येथे अनके मजली इमारती बांधण्यात येणार असून तेथे हेरिटेज गॅलरी तयार करण्यात येणार आहे.

विविध संस्था मार्गदर्शन घेणार

सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाची योजनेला रेल्वे बोर्डाने तत्त्वतः मंजुरी दिली असून तिचे बुधवारी मध्य रेल्वेच्या मुख्यालयात सादरीकरण करण्यात आले. हेरिटेज कमिटीसह विविध संस्थांच्या मार्गदर्शनाखाली यासंदर्भात पुढील पावले उचलण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

मस्जिद दिशेला प्रवाशांसाठी मोकळी जागा

सीएसएमटीच्या लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणार्‍या प्लॅटफॉर्म क्र. 18च्या बाजूला तेथे पादचारी पुलाला समांतर असा ‘डेक’ बांधण्यात येणार आहे. तसेच मस्जिद दिशेला लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे मार्गिकांचे यार्ड रिमॉडेलिंग करण्यात येणार असून उपनगरीय आणि मेन लाइन यांच्यामध्ये प्रवाशांसाठी आणखी एक ‘कॉनकार्ड’ एरिया तयार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या