
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटांबंदीनंतरच्या काळापेक्षा दुप्पट पैसा आता लोकांच्या हाती आहे. यातील काही पैसा हा बँकांमध्ये डिपॉझिट व्हायला पाहिजे होता. मात्र, तो झालेला नाही. याला सर्वसामान्यांची नोटा जवळ बाळगण्याची सवय किंवा मोठय़ा प्रमाणात केलेली साठेबाजी कारणीभूत असल्याची चिंता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) व्यक्त केली आहे.
‘आरबीआय’ने आतापर्यंत १९.३ लाख कोटी रुपये बाजारात आणले आहेत. त्यातील लोकांच्या हातात सध्या १८.५ लाख कोटी आहेत. तेच नोटाबंदीनंतर देशात लोकांच्या हाती ७.८ लाख कोटी होते तर बाजारात ८.९ लाख कोटी उपलब्ध होते.
मे महिन्यांत १० ते ११ राज्यांमध्ये नोटांची चणचण होती. काही राज्यांमध्ये सुरू असलेला लग्नाचा मोसम यामुळे ही टंचाई निर्माण झाल्याचा दावा त्या त्या राज्य सरकारांनी केला होता. मात्र, कनार्टक आणि इतर राज्यांमधील निवडणुकीत हा पैसा भाजपने वापरला, असा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. आता बाजारात हा पैसा उपलब्ध आहे. मात्र, तो जेवढय़ा प्रमाणात बँकांमध्ये जमा व्हायला पाहिजे होता, तेवढा झालेला नाही. याला नोटांची मोठय़ा प्रमाणात साठेबाजी आणि नोटा जवळ बाळगण्याची हिंदुस्थानींची सवय कारणीभूत आहे, असे ‘आरबीआय’चे म्हणणे आहे.
– नरेंद्र मोदी सत्तेत येण्याआधी (२०१४) लोकांकडे १३ लाख कोटी होते.
– नोटाबंदीचा निर्णय जाहीर करण्याआधी लोकांकडे १७ लाख कोटी होते.
– नोटाबंदीनंतर ही संख्या घटून ८.९ लाख कोटी झाली.
– आता लोकांकडे १८.५ लाख कोटी आहेत.
– नोटाबंदीवेळी ५०० आणि १०००च्या नोटा बाद करण्यात आल्या. त्याऐवजी २००० आणि ५०० च्या नोटा बाजारात आणल्या. मात्र, त्याचबरोबर २०० आणि १० च्या नवीन नोटाही बाजारात आणल्या.
– मे महिन्यांत पुन्हा एकदा नोटांची चणचण जाणवू लागल्यानंतर ५००च्या नोटांची छपाई चारही कारखान्यांमधून दिवस-रात्र सुरू केली.

























































