
सामना प्रतिनिधी । मुंबई
दहावीच्या परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणारे एसएससीचे ३३ हजार २०१ विद्यार्थी, त्यातच आयसीएसई, सीबीएसईच्या नव्वदीपार विद्यार्थ्यांची भर यामुळे यंदा नामांकित कॉलेजांचा कटऑफचा टक्का वधारणार आहे. गेल्या वर्षी ९० टक्के आणि अधिक गुण मिळविणाऱया विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने ८५ टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा पहिल्या यादीत नामांकित कॉलेजची लॉटरी लागली होती. पण यंदा गुणवंत विद्यार्थी वाढल्याने चित्र उलट असणार आहे.
मुंबईतील नामांकित कॉलेजचा कटऑफ ९० टक्क्यांच्या वरच क्लोज होणार आहे. यंदा एसएससीच्या १३ हजार ३२९ विद्यार्थ्यांना ९० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. यात भर पडणार आहे ती केंद्रीय बोर्डाच्या नव्वदीपार असलेल्या सुमारे पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांची. त्यामुळे यंदा रुईया, रूपारेल, पोदार, झेवियर्स, वझे-केळकर, एन. एम. यांसारख्या नामांकित कॉलेजचा पहिल्या यादीचा कटऑफ ९२ ते ९३ टक्के गाठेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आर्टस्ला पसंती; ८० ते ७० टक्केवाले कॉमर्सकडे
रुईया, झेवियर्स कॉलेजचा आर्टस्च्या जागा ९० टक्क्यांवरच क्लोज होत आहेत. त्यामुळे हल्ली आर्टस्लाही विद्यार्थ्यांची पसंती पाहायला मिळत आहे. आर्टस्मधून फॉरेन लँग्वेज, इतिहास संशोधन, कला क्षेत्रात, जाहिरात क्षेत्रात करीअरच्या नव्या संधी उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचा ओढा आर्टस्कडे वाढत आहे. यंदा ८० ते ७० टक्क्यांदरम्यान ५८ हजार ५७९ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांचा कल कॉमर्स शाखेकडे असतो. पुढे पदवी अभ्यासक्रमातही कॉमर्स शाखेतून विविध स्पेशलायझेशन कोर्सला प्रवेश घेऊन नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होतात.































































