‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशाची सर्वोच्च तपास यंत्रणा ‘सीबीआय’मधील लाचखोरीचे वादळ आणि आरोप-प्रत्यारोपांची चौकशी करणारा प्राथमिक अहवाल केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) आज सर्वोच्च न्यायालयात सीलबंद पाकिटात सादर केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी येत्या शुक्रवारी (दि. 16) होणार असून न्यायालयाच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष लागले आहे.

मांस निर्यातदार मोईन कुरेशीकडून सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी 3 कोटी रुपयांची लाच घेतल्याचे प्रकरण गेल्या महिन्यात उघडकीस आले. अस्थाना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि चौकशी सुरू केली. मात्र अस्थाना यांनी संचालक आलोक वर्मा यांच्यावर आरोप केले. या वादात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून वर्मा आणि अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आणि ‘सीव्हीसी’ चौकशी नेमली. दरम्यान, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. आलोक वर्मा यांनी सरकारविरुद्ध न्यायालयात अव्हान दिले. ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनीही याचिका दाखल केली. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी याचिका दाखल करून वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. आलोक वर्मा यांनी ‘राफेल’ कराराची चौकशी सुरू केल्यामुळे सरकारवर सूडबुद्धीच्या कारवाईचा आरोप होत आहे.

काय घडले न्यायालयात….
‘सिव्हीसी’ चौकशी समितीच्या प्राथमिक अहवाल न्यायालयात सीलबंद पाकिटात सादर.
‘सिव्हीसी’कडून तीन सेटमध्ये अहवाल.
रविवारीही रजिस्ट्रार ऑफीस उघडे होते; पण दक्षता आयोगाने अहवाल देण्यास दिरंगाई केल्यामुळे न्यायालयाकडून कानउघाडणी.
सुप्रीम कोर्टाने कानउघाडणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नागेश्वर राव यांच्याकडून हा अहवाल सादर करण्यात आला.

आलोक वर्मांविरुद्ध ठोस पुरावे नाहीत?
केंद्र सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवलेले ‘सीबीआय’ संचालक आलोक वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी ‘सीव्हीसी’ने केली. मात्र वर्मा यांच्याविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नसल्याचा ‘सीव्हीसी’चा अहवाल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

summary- cvc report submitted in supreme court