
सामना प्रतिनिधी । बर्मिंगहॅम
हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यामधील उपांत्य फेरीचा थरार अनुभवल्यानंतर जगभरातील क्रिकेटप्रेमींना उद्या आणखी एक ब्लॉकबस्टर लढत पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये बर्मिंगहॅम येथे बाद फेरीची लढत रंगणार असून यावेळी यजमान इंग्लंडचा संघ गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देऊन तब्बल 27 वर्षांनंतर फायनलमध्ये पोहोचतोय का हे पाहणे रंजक ठरणार आहे.कांगारूंचा संघ मात्र सलग दुसर्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी जिवाचे रान करताना दिसेल.
यजमान तीन वेळा उपविजेते
क्रिकेटचा जन्मदाता म्हणून इंग्लंडला ओळखले जात असले तरी त्यांना अद्याप एकदाही वन डे वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. 1979, 1987 व 1992 सालामध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेय. दोन वेळा त्यांचा खेळ उपांत्य फेरीतच खल्लास झालाय.
स्टेडियम राहणार रिकामे
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ‘टीम इंडिया’ दुसऱया उपांत्य लढतीत इंग्लंड किंवा न्यूझीलंड या संघाविरुद्ध खेळणार असे गृहीत धरून हिंदुस्थानी चाहत्यांनी त्या सामन्याची तिकिटे आधीच घेऊन ठेवली होती. मात्र अखेरच्या साखळी लढतीत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला हरविल्याने उपांत्य लढतीचे अंदाज चुकले. आता दुसऱया उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलिया-इंग्लंड भिडणार असल्याने बहुतांश हिंदुस्थानी प्रेक्षकांनी घेतलेली तिकिटे परत करण्यास सुरुवात केल्याने स्टेडियम रिकामे राहण्याची शक्यता आहे.
आजची उपांत्य लढत
ऑस्ट्रेलिया – इंग्लंड
बर्मिंगहॅम, दुपारी 3 वाजता























































