सायबर भामटय़ाने आजोबांना पावणे चार लाखांना गंडविले

तरुणीच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते बनवून त्याआधारे सायबर भामटय़ाने एका 60 वर्षीय वृद्धाला मैत्रीची विनंती पाठवली. वृद्धानेही कुठलीही खातरजमा न करता ती विनंती स्वीकारली. मग दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले. अखेर व्हायचे तेच झाले. मुलीच्या नावाने चॅटिंग करणाऱ्या भामटय़ाने वृद्धाचे सेक्सटॉर्शन करीत त्यांना तीन लाख 76 हजार रुपयांचा चुना लावला. मात्र डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांनी त्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

गंगाराम (60, नाव बदललेले) यांच्या एफबीवर एका तरुणीची मैत्रीची विनंती आली. ती विनंती मान्य केल्यानंतर एका व्हॉट्सऍप नंबरवरून गंगाराम यांना व्हिडीओ कॉल केला आणि गंगाराम यांचा मॉर्फ केलेला अश्लील व्हिडीओ तयार करून पाठविला. मग तो व्हिडीओ यूटय़ूबवर प्रसारित करण्याची धमकी देत आरोपीने गंगाराम यांच्याकडे पैशांची मागणी केली. गंगाराम यांनी भीतीपोटी तीन लाख 76 हजार रुपये आरोपीला ऑनलाईन दिले. पण आरोपीची मागणी वाढूच लागल्यानंतर गंगाराम यांनी डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तुकाराम डिगे व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक बाबींचा अभ्यास केला असता गंगाराम यांचे सेक्सटॉर्शन करणारा आरोपी हा राजस्थान येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार डिगे व पथकाने राजस्थानातील बाबमनी गाव गाठून त्या सायबर भामटय़ाला पकडले. आरोपीने फेसबुकवर तरुणीच्या नावाने बनावट खाते खोले होते. त्या खात्यावरून गंगाराम यांना मैत्रीची विनंती पाठवली आणि कांड केला होता, पण तुकाराम डिगे व त्यांच्या पथकाने आरोपीला दणका दिला.