सायकल बँक

334

>> संजीवनी धुरी-जाधव

पुणं म्हणजे सायकलींचं शहर. आत्ता जरी काळ बदलला असला तरी पुण्यात सायकल हाणणारी तरुणाई प्रसिद्ध. पुण्यात सायकल बँक हा नवीन उपक्रम सुरू झाला आहे.

घरची परिस्थिती बेताचीच… आई-वडिलांना आर्थिक हातभार म्हणून काम करताहेत… शिक्षणाच्या ओढीमुळे पाच-सहा कि.मी. अंतर पायी जाऊन दिवसा काम आणि रात्री शिक्षण अशी तारेवरची कसरत करत आहेत. अशा या ‘लर्निंग विथ अर्निंग’ करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुण्याच्या सरस्वती मंदिर संस्थेच्या पुना नाइट हायस्कूल व श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्ट ज्युनियर कॉलेजच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त ‘सायकल बँक’ हा उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम खरंच कौतुकास्पद नाही का?

सरस्वती मंदिर संस्थेच्या पुना नाइट हायस्कूल व श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्ट ज्युनियर कॉलेजने यंदा शतक महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने त्यांनी सुरू केलेल्या ‘सायकल बँक’ या उपक्रमांतर्गत परिवर्तन सामाजिक संस्था आणि इंद्राणी एस. बालन फाऊंडेशनकडून विद्यार्थ्यांना 20 सायकली दिल्या असून त्यांची बँक तयार केली आहे. याबाबत शाळेचे प्राचार्य अविनाश ताकवर्ले सांगतात की, पुण्यातील आमची ही पहिली रात्रशाळा असून त्याला 100 वर्षे पूर्ण झाली. आतापर्यंत 55 हजार विद्यार्थी येथून शिकून बाहेर पडले आहेत. सध्या या शाळेत आठवी ते बारावीपर्यंत 525 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही मुले ग्रामीण भागातून पुणे शहरात शिकायला येतात. दिवसा तिथल्या लहान-सहान कंपन्यांमध्ये काम करतात आणि रात्री शिक्षण घेतात. यावर उपाय म्हणून या सायकल बँकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवश्यक तेव्हा सायकली देण्यात येतील. सायकलची गरज पूर्ण झाल्यानंतर, विद्यार्थ्यांनी त्या परत करायच्या आहेत. दिवसभर काबाडकष्ट करायचे, संध्याकाळी शिक्षण घ्यायचे. पुण्यासारख्या शहरात राहणीमान फार खर्चिक आहे. त्यात राहत्या ठिकाणाकरून शाळेत प्रवास करण्यासाठी पैसे खर्च होतात. आठवी, नववी, दहावीच्या मुलांना ते बाल कामगार असल्यामुळे काम मिळत नाही. 18 वर्षांखालील मुलांना नोकरी करता येत नाही. येण्याजाण्याचे अंतर मोठे असते. पाच-सहा, दहा, पंधरा वीस किलोमीटर अंतरावरून विद्यार्थी येतात. पुण्यात राहणं त्यांना परवडत नाही त्यामुळे त्यांचे जेथे नातेवाईक असतात त्यांच्याकडे राहून ते शहरात प्रवास करत असतात. त्यामुळे त्यांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था होते. अशा विद्यार्थ्यांना सायकल दिली तर त्यांचा वेळ वाचेल आणि त्यांना शिक्षणाकडे लक्षही देता येईल. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहतील. दिवसभर काम उरकायचे आणि रात्री सायकलने शाळेत यायचे. सायकल दाखवायची. दर शनिवारी सायकल रिपेअर केली जाणार. त्याला काही प्रॉब्लेम असेल तर ती मोफत रिपेअर करून दिली जाणार आहे. सायकलचे मेण्टेनेस आम्ही जे काही असेल ते आम्ही भरणार असल्याचे अविनाश ताकवर्ले सांगतात. जी मुलं फार गरजू आहेत, जे नोकरी करत आहेत, ज्यांना आधार नाही अशा विद्यार्थ्यांना या सायकली देण्यात आल्या आहेत. या सायकली ग्रामीण भागातील मुलांसाठी आहेत आणि आमच्याकडे 40 टक्के ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत. याचबरोबर विद्यार्थ्यांना संगणकाचेही मोफत शिक्षण दिले जाते. पुस्तकाबरोबर टेक्नॉसॅव्ही असणंही तेकढंच महत्त्वाचं असतं, असंही प्राचार्य अविनाश ताकवर्ले सांगतात.

दरवर्षी मी बँकेत 100 विद्यार्थ्यांची खाती उघडतो. त्यामुळे त्यांना बँकेचे व्यवहार कसे करायचे ते कळायला लागते. बँकेची कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात होती. नंतर ग्रंथालय आलं. ग्रंथालयातून आपण पुस्तक देवघेव करतो. त्यातूनच मग ‘सायकल बँक’ ही संकल्पना सुचली. ज्यांच्याकडे गाडय़ा आहेत ते सायकलींचा वापर करत नाहीत, पण शाळाबाह्य मुलंही आहेत. साधारण आपल्याकडे वीस नवीन सायकली आहेत. त्यात अजून भर होण्याची शक्यता आहे. आम्ही सामाजिक संस्थांशी संपर्क साधतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही संकल्पना महाराष्ट्रभर पसरली.

उपक्रम महाराष्ट्रभर पोहोचावा
शासनाला माझी विनंती आहे की, शहरापेक्षा ‘सायकल बँक’ या उपक्रमांची ग्रामीण भागात जास्त गरज आहे. हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचावा ही माझी भावना आहे. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या शाळा दूर-दूर असतात अशा विद्यार्थ्यांना त्याची खरी गरज आहे. त्यांना एसटीची सोय नसते, पायी प्रवास करावा लागतो. हा जो फरक ग्रामीण भागात आहे ते या प्रवाहात येऊन शिक्षण घेतील. जोपर्यंत शाळेत येतो तोपर्यंत सायकल वापरता येणार आहे. त्यामुळे मुलांची उपस्थिती काढणार. या उपक्रमामुळे विद्यार्थी फार आनंदी आहेत, पण सायकली कमी पडत आहेत. त्यामुळे आम्ही काही स्वयंसेवी संस्थांकडेही ‘सायकल बँक’च्या मदतीसाठी आवाहन केले आहे, असेही प्राचार्य ताकवर्ले सांगतात.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या