
झारखंडच्या हजारीबाग जिह्यातील संतोष कुमार गुप्ता या इंजिनीयरने हॉयड्रॉलिक प्रणालीवर धावणारी सायकल बनविली असून तिचे पेटंटही नोंदवले आहे. हायड्रोलिक सायकल ताशी 82 कि.मी. पर्यंतच्या वेगाने पळू शकेल. या सायकलला कोणत्या प्रदूषणकारी इंधनाची गरज भासणार नाही, तसेच ई- बाईकसारखे चार्ज करण्यासाठी विजेची गरज भासणार नाही.
संतोष गुप्ता याने 2011 मध्ये इंजिनीयरिंगची पदवी मिळवली. त्यानंतर त्याने नोकरी शोधण्याऐवजी हायड्रोलिक सायकल बनविण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. त्याने बिना इंजिनची आणि बिना इंधनाची बाईक बनविण्याचे ध्येय ठेवले. ते आता पूर्ण झाले आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत असताना इंधन खर्च आणि पर्यावरण रक्षणासाठी ही सायकल चांगला पर्याय ठरणार आहे.
- द्रवचालित प्रणालीमुळे सायकलला सतत पायडल मारावे लागणार नाहीत. गुप्ता याने साध्या सायकलची चेन हायड्रॉलिक कॉइलने बदलली आहे. पायडल मारल्यावर जी शक्ती तयार होते ती हायड्रोलिक सिलिंडरमधून ऑइलच्या माध्यमातून मागील चाकाला मिळणार आहे. म्हणजेच एका ठिकाणी ताकद लावली की ती दुसऱया ठिकाणी पोहचेल. जास्त पायडल न मारता सायकल 82 किमी प्रति तासाचा वेग पकडू शकणार आहे.
























































