
अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या ‘तौकते’ चक्रीवादळाने आज मुंबईलाही भयानक तडाखा दिला. मुंबईचा समुद्र खवळून पाणी रस्त्यावर आले होते. विविध भागांमध्ये शेकडो झाडे कोसळली. किनारपट्टीवरील नागरिकांनी वादळाच्या भीतीने सुरक्षित स्थळी धाव घेतली. मच्छिमारांचेही या वादळामुळे बरेच नुकसान झाले. खवळलेल्या समुद्रातून त्यांना आपल्या बोटी किनाऱयावर सुरक्षित आणाव्या लागल्या. गिरगावमधील जुन्या चाळींवरील पत्रे सोसाटय़ाच्या वाऱयामुळे उडून गेले. गेटवेजवळ उंच लाटा उसळल्या. त्यांचा वेग इतका होता की किनाऱयावरील बॅरीकेड्स दूरवर फेकले गेले. समुद्राचे रौद्ररुप पाहून नागरिक भयभीत झाले होते.
24 तासांत अतिवृष्टीचा इशारा
कुलाबा वेधशाळेने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर ताशी 120 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
बस वाहतूक वळवली
दादर, हिंदमाता आदी ठिकाणी पाणी तुंबल्याने शिवाय रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने बसेसची वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली. वादळी वाऱयाचा अंदाज घेऊन बस वाहतूक सुरू ठेवण्यात आली. वाऱयाचा वेग वाढल्याने रस्ते वाहतूक रेंगाळली होती.
महापौरांकडून आढावा
वादळी वारे आणि मुसळधार पावसातही महापौर किशोरी पेडणेकर यांनी चौपाटय़ांसह मुंबईच्या विविध भागांत जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईत काही ठिकाणी पाणी साचले होते, परंतु त्याचा निचरा करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी तैनात केले असल्याचे त्यांनी सांगितले. या पाण्याचा निचरा लवकरच होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
झाड पडल्याने मोटारीत अडकलेल्याची सुटका
माहीमच्या लेफ्टनंट दिलीप गुप्ते मार्गावर आज संध्याकाळी जबरदस्त वादळी तडाख्यामुळे रस्त्यावरील महाकाय झाड उन्मळून पडले. हे झाड रस्त्यावरून जाणाऱया मोटारीच्या टपावरच पडले. मोटारीत अकडलेल्या चालकाची स्थानिक तरुणांनी सुटका केली आणि त्याला उपचाराकरिता हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल केले. वांद्रे येथील रहिवासी राजन पाटणकर संध्याकाळी चार वाजता या मार्गावरून जात असताना नेमके त्याचवेळेस रस्त्यावरील झाड त्यांच्या मोटारीवर कोसळले. झाडांच्या फांद्यांमुळे राजन पाटणकर यांना मोटारीतून बाहेर पडता येत नव्हते. ही दुर्घटना या परिसरातील श्री गणसिद्धिविनायक सोसायटीतील तरुणांनी पाहिली आणि मदतीसाठी पुढे आले. त्यांनी पाटणकर यांना मोटारीतून बाहेर काढले. त्यानंतर शिवसेना उपशाखाप्रमुख संदीप गमरे, युवासेनेचे दिनार पाटील यांनी रुग्णवाहिकेतून पाटणकर यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती सुधारत आहे.
विमाने उड्डाणेही थांबवली
मुसळधार पाऊस व वाढत जाणारा वाऱयाचा वेग तसेच ढगाळ वातावरणामुळे मुंबई विमानतळावरील सर्व विमानांची उड्डाणे सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली.
वांद्रे–वरळी सी लिंक बंद
वादळी वाऱयासह मुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी 10 वाजल्यापासून वांद्रे-वरळी सी लिंक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला.
येथे पाणी साचले
गांधी मार्पेट, किंग्ज सर्कल, दादर, परळ, हिंदमाता, सायन रोड क्रमांक 24, समाज मंदिर हॉल, प्रतीक्षानगर, अॅण्टॉप हिल सेक्टर -7, वांद्रे -नॅशनल कॉलेज, शेल कॉलनी, चेंबूर, कुर्ला (एसटी आगार) मिलन सब वे आदी ठिकाणी.
मढमधील नौकांना फटका
‘तौकते’च्या कहराचा फटका मुंबईतील झाडे, सार्वजनिक वाहतुकीला बसलाच, पण वादळाच्या पार्श्वभूमीवर मढ आणि इतर ठिकाणी नांगरून ठेवलेल्या मासेमारी नौकांनाही बसला आहे. मढमधील तलपशा बंदरात नांगरून ठेवलेल्या सुमारे 30 नौकांचे दोर त़ुटून नौका एकमेकांवर आदळल्यामुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. मच्छीमारांच्या नुकसानीची दखल मत्स्यव्यवसाय विभागाने घेऊन त्यांना योग्य ती नुकसानभरपाई घोषित करावी, अशी मागणी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे किरण कोळी यांनी केली आहे.
विविध दुर्घटनांत सात जण जखमी
चेंबूर पूर्व सुमननगर, चिखलवाडी येथे घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना भिंत कोसळून 4 जण जखमी झाल्याची घटना घडली. यातील 3 जखमींवर माँ रुग्णालयात तर एकाला शीव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत आश्रय माळी (21), सुदर्शन माळी (23), आकाश माळी (26) आणि सागर हनुमान (22) हे जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती आता सुधारली आहे.
बोरिवली काजूपाडा येथे व्रेनचा भाग घरावर कोसळून कुंदा सकपाळ (40), सागर सकपाळ (25), देवयानी सकपाळ हे किरकोळ जखमी झाले. तर गणेशनगर सोसायटी अंधेरी पश्चिम येथे एका घराचा भाग कोसळून एक महिला जखमी झाली. या सर्व जखमींची प्रकृती आता सुधारली आहे.
नुकसान झालेल्या कोळी बांधवांना नुकसानभरपाई द्यावी; खासदार राहुल शेवाळे यांची मागणी
‘तौकते’ चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्रातील किनारी भागांना बसला असून याचा परिणाम मुंबईच्या ट्रॉम्बे आणि माहुल कोळीवाडा परिसरातही बघायला मिळाला. पूर्व उपनगरातील ट्रॉम्बे जेट्टी आणि माहुल कोळीवाडा परिसराचा पाहणी दौरा खासदार राहुल शेवाळे यांनी केला. यावेळी त्यांनी स्थानिक कोळी बांधवांशी संवाद साधून झालेल्या नुकसानाचा त्यांनी आढावा घेतला. ‘ट्रॉम्बे जेट्टीच्या ठिकाणी सुमारे 30-40 बोटींचे नुकसान झाले असून वादळाच्या तडाख्याने ट्रॉम्बे आणि माहुल कोळीवाडय़ातील काही घरांचे नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्त कोळी बांधवांना राज्य सरकारने आर्थिक मदत घ्यावी’ अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.


































































