
अवघे जग कोरोनाच्या संकटाशी लढत असतानाच आज ‘तौक्ते’ चक्रीवादळाने रायगड, ठाणे व पालघर जिह्याला जोरदार तडाखा दिला. गेल्या दोन दिवसांपासूनच ‘तौक्ते’ आपली झलक दाखवत होता. पण किनारपट्टीवर हे वादळ धडकले आणि एकच हाहाकार उडाला. बेभान वारे तसेच तुफानी पाऊस यामुळे होत्याचे नव्हते झाले. शेकडो झाडे उन्मळून पडली असून हजारो घरांचे नुकसान झाले आहे. या वादळाने एकूण सातजणांचा बळी घेतला आहे. उरणमध्ये भिंत कोसळून दोन महिला ठार झाल्या. नवी मुंबईतही एकाचा बळी गेला असून उल्हासनगरात धावत्या रिक्षावर झाड पडून प्रवासी दगावला. ग्रामीण भागात पाचशेहून अधिक विजेचे खांब कोसळल्याने वीज गायब झाली. ठाणे, रायगड व पालघर हे तीनही जिल्हे सागरी किनारपट्टीजवळचे असल्याने या भागाचे प्रचंड नुकसान झाले. ‘तौक्ते’च्या भीतीने आजही अनेकांनी आपली रात्र जागून काढली.
महाकाय होर्डिंग कोसळले, तिघे बचावले
कल्याणच्या शीळ रोडवर महाकाय होर्डिंग थेट एका धावत्या टेम्पोवर कोसळले. या टेम्पोचा पुढचा भाग, चेसी आणि केबिन पूर्णपणे चेपली. डोंबिवली अग्निशमन दलाचे अधिकारी नंदकुमार शेंडकर आणि त्यांच्या पथकाला या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी छबन चौधरी (56), सचिन चव्हाण (35) आणि टेम्पोचालक या तिघांना केबिनचे पत्रे कापून बाहेर काढले. कल्याणच्या मेट्रो मॉलसमोर व पलावा मॉलसमोर रस्त्यावर मोठे होर्डिंग कोसळले. तीन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनेत सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
आज लसीकरण बंद
चक्रीवादळाचा परिणाम उद्या ठाण्यात होणाऱया लसीकरणावरही झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्यातील सर्व पेंद्रांवरील लसीकरण उद्या मंगळवारी पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. नागरिकांनी लसीसाठी गर्दी करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
- उरणमध्ये राम मंदिराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना भिंत कोसळून दोन महिला ठार झाल्या. सुनंदाबाई घरत (55) व अवेडा गावच्या नीता नाईक (50) अशी त्यांची नावे आहेत. पेण येथील रामा कातकरी (80) यांच्यावर आंब्याच्या झाडाची फांदी पडून त्यांचा मृत्यू झाला आहे तर पत्नी सीमा कातकरी या जखमी झाल्या आहेत. रोह्यातही अंगावर झाड पडल्याने नारायण साबळे (45) यांचा मृत्यू झाला. काशिमीरा येथे घरावर झाड पडून लक्ष्मी गायकवाड (75) यांना जीव गमवावा लागला.
- रायगड जिह्यात वादळी वाऱयांमुळे 65 उच्च दाबवाहिनीचे तर 249 कमी दाबवाहिनीचे विद्युत पोल कोसळले. त्यामुळे विविध ठिकाणचा वीजपुरवठा तातडीने बंद करण्यात आला.
- पेण एसटी डेपोमध्ये वादळाच्या तडाख्याने मोठे झाड बसवर कोसळले. सुदैवाने कोणीही प्रवासी आतमध्ये नसल्याने जीवितहानी झाली नाही. झाडे पडल्याच्या घटनांमुळे पेण-अलिबाग रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद होता.
रायगड तसेच पालघर किनारपट्टीजवळ राहणाऱया हजारो रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले होते. पण आज सकाळपासून किनारपट्टीवर लाटांनी हल्ला चढवला. त्यातच घोंगावणारे वादळ.. यामुळे अनेकांची पळताभुई थोडी झाली. रायगड जिल्हा प्रशासनाने आधीच सतर्कतेचा इशारा दिला होता. मुसळधार पावसाने रायगडकरांना दहा तासांहून अधिक काळ भीतीच्या छायेखाली ठेवले होते. रायगड जिह्यातील वादळात चार व्यक्तींचा मृत्यू झाला असून 5240 घराचे अंशतŠ तर नऊ घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे. एका जनावरालाही आपला जीव गमवावा लागला.
ठाण्याच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम
चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा ठाणे शहराच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला आहे. शहाड येथील वीजपुरवठा बंद झाला. त्यामुळे ठाणे शहराला स्टेममार्फत होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
समुद्रात बोट अडकली
उत्तनच्या पाली येथील न्यू हेल्प मेरी मच्छीमार बोट समुद्रात अडकली आहे. डायमंड मिरांडा यांच्या मालकीची ही बोट असून त्यात सहा खलाशी आहेत. खोल समुद्रात ही बोट अडकली असून तिला वाचवण्याचे प्रयत्न तटरक्षक दलाने सुरू केले आहेत. बोटीवरील मच्छीमारांच्या कुटुंबीयांनीही चिंता व्यक्त केली आहे.
केळीच्या बागा भुईसपाट
वसई, आगाशी येथील अनेक केळीच्या बागा चक्रीवादळाच्या तडाख्यात भुईसपाट झाल्या आहेत. वसईची केळी आणि सुकेळी संपूर्ण देशात प्रसिद्ध असून केळीच्या बागा नष्ट झाल्याने बागातदार हवालदिल झाले आहेत. केळीच्या बागांबरोबरच आंबे, शेगटीची झाडेदेखील जमीनदोस्त झाली आहेत.
पालघरमध्ये दोन लाख ग्राहकांची वीज गुल
जोरदार वादळी वारे व मुसळधार पावसामुळे पालघर महावितरण विभागात 93 वीज वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे 1 लाख 98 हजार ग्राहकांची वीज गुल झाली. तर सत्तरहून अधिक वाहिन्यांपैकी 55 वीज वाहिन्यांचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. 38 वीज वाहिन्यांचा व 12 उपकेंद्रांचा वीजपुरवठा युद्ध पातळीवर सुरू करण्याचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होते.
जेएनपीटी ठप्प
‘तौक्ते’ चक्रीवादळाचा फटका जेएनपीटी बंदरासह चारही खासगी बंदरांनाही बसला आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून रविवारी सकाळपासूनच सर्वच बंदरांचे काम बंद करण्यात आले होते. रेल्वेची पंटेनर वाहतूकही बंद ठेवली. जेएनपीटीने घेतलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांमुळे बंदराचे फारसे नुकसान झालेले नाही. चक्रीवादळ व त्याच्या परिणामांचा अंदाज घेऊनच बंदराचे काम सुरू होईल, अशी माहिती जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिली.
डोंबिवलीत ओव्हरहेड वायरला आग
डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळ सहाव्या मार्गिकेवरील ओव्हरहेड वायरवर झाड कोसळल्याने आग लागली. या मार्गिकेवरून लांबपल्ल्याच्या गाडय़ा मुंबईच्या दिशेने जातात. या गाडय़ांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. झाड बाजूला केल्यानंतर तासाभरात ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करून रेल्वे वाहतूक पूर्ववत केली. सकाळच्या वेळेस इमर्जन्सी कामासाठी जाणाऱयांची मात्र चांगलीच पंचाईत झाली.
उल्हासनगरात धावत्या रिक्षावर झाड पडले
उल्हासनगरातील गांधी रोड, जयबाबा धाम रोडवरून रिक्षा जात असताना महाकाय झाड त्यावर कोसळले. अग्निशमन दलाचे बाळू नेटके यांनी जवानांसह घटनास्थळी धाव घेऊन दोघांना बाहेर काढले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. त्यापैकी लखुमल कामदार या 62 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला असून रिक्षाचालक सुनील मोहरे याचा पाय फॅक्चर झाला. दरम्यान भाटिया रोड येथे इमारतीवरील पत्र्याचे शेड हवेत उडून जमिनीवर पडल्याच्या घटना घडल्या. प्रसंगावधान बघून 10 जण धावत सुटल्याने ते बचावले.
दर्या खवळला ; बोटी फुटल्या
‘तौक्ते’ चक्रीवादळाचा प्रभाव आज सकाळपासून पालघर जिल्हातील किनारपट्टी भागाला मोठय़ा प्रमाणात बसला. सोसाटय़ाचा वारा व पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. खवळलेला दर्या आणि लाटांचा तडाखा यामुळे अनेक बोटी फुटल्या असून मच्छीमार बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब, झाडे पडण्याच्या घटनाही घडल्या. महावितरणाने वसई-विरारमधील अनेक भागांत विद्युत पुरवठा बंद केला. अर्नाळ्यात सोसाटय़ाच्या वाऱयामुळे समुद्रात नांगरून ठेवलेल्या बोटी भरकटून किनाऱयावर येऊन धडकल्याने मोठे नुकसान झाले. अर्नाळा परिसरातील हजारो बोटी सुरक्षिततेसाठी चिखलडोंगरी खाडीत नेल्या असून छोटय़ा अनेक बोटींचे नुकसान झाले आहे. किनाऱयावर सुकत ठेवलेल्या सुक्या मासळीलाही याचा मोठा फटका बसला आहे.
विजेचा खाबंच अंगावर कोसळला
ऐरोली येथे राहणारे विशाल नारळकर हे रस्त्याने जात असताना विजेचा खांब अचानक त्यांच्या अंगावर कोसळल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. वाशी येथील सेक्टर 10 मध्ये झाड पडल्यामुळे होंडा सिटी कारचे नुसकान झाले. या दुर्घटनेमध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
पालकमंत्री शिंदे यांनी घेतला आढावा
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपतकालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी एमएमआर क्षेत्रातील प्रत्येक महानगरपालिकेच्या आपतकालीन कक्षाला पह्न करून त्यांनी तेथील स्थितीची माहिती करून घेतली. विविध घटनांमध्ये जखमी झालेल्यांवर चांगले उपचार करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले.

































































