
मुंबईतील डी. जी. रुपारेल कॉलेजच्या मनमानी कारभाराला अखेर युवासेनेच्या दणक्यामुळे चाप बसणार आहे. प्राध्यापकांच्या नियुक्त्यांअभावी रखडलेल्या द्वितीय आणि तृतीय वर्षाचे ऑनलाइन वर्ग आता लवकरच सुरू होणार आहेत. युवासेनेच्या पाठपुराव्यानंतर मुंबई विद्यापीठाने कॉलेजच्या रखडलेल्या प्राध्यापकांच्या नियुक्त्या तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईतील डी. जी. रुपारेल कॉलेजमधील स्वयं अर्थसहाय्य अभ्यासक्रमाचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले नव्हते. याबाबत विद्यार्थ्यांकडून विचारणा केली असता अद्याप शिक्षक भरती झाली नसल्याने ऑनलाइन वर्ग होत नसल्याचे कॉलेजकडून सांगण्यात येत होते. ऑनलाइन वर्ग होत नसल्याने होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेत विद्यार्थ्यांनी युवासेनेकडे धाव घेतली होती. याची दखल घेत युवासेना प्रमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबई विद्यापीठातील युवासेनेचे मॅनेजमेंट काऊन्सिलचे सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना निवेदन सादर करून संबंधितांवर कारवाई करून तातडीने शिक्षक भरती करण्याची मागणी केली.
अखेर या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई विद्यापीठाने घेतली. कॉलेज प्रशासनाला धारेवर धरत तातडीने भरती प्रक्रिया राबविण्याची सूचना विद्यापीठाने केली. अखेर कॉलेजकडून त्वरित कारवाई होऊन भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. 27 जुलैपासून ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे महाविद्यालय व्यवस्थापनाने आश्वासन दिले असल्याचे युवासेनेचे मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले. कॉलेजच्या गैरकारभारामुळे विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या नुकसानीस जबाबदार धरून विद्यापीठाद्वारे चौकशी समिती नेमण्याची मागणीही करण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले.

























































