
हिंदुस्थानचा स्टार खेळाडू डी. गुकेशने चीनच्या वेई यू याचा पराभव करीत पुन्हा एकदा नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत जेतेपदाच्या शर्यतीत उडी घेतली आहे. आता नवव्या फेरीअखेर यजमान नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन 15 गुणांसह अव्वल स्थानी असेल, तर डी. गुकेश 14.5 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे.
जगज्जेत्या डी. गुकेशने वेई यू याचा पराभव करीत संपूर्ण तीन गुण मिळवित जेतेपदाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. पाच वेळचा जगज्जेता मॅग्नस कार्लसन केवळ अर्ध्या गुणांनी आघाडीवर असल्याने या स्पर्धेत आजच्या घडीला एकाहून अधिक जेतेपदाचे दावेदार आहेत. त्यामुळे सहा खेळाडूंच्या या डबल राऊंड रॉबिन स्पर्धेत आता अखेरच्या फेरीत विजय मिळवून कोण बाजी मारणार याकडे तमाम बुद्धिबळ शौकिनांच्या नजरा लागल्या आहेत. नवव्या फेरीत पराभवाच्या छायेत असलेल्या कार्लसनने लढतीत जबरदस्त पुनरागमन करीत अमेरिकेच्या फॅबियानो कारूआना याचा पराभव करीत गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली. आता अखेरच्या फेरीत हिंदुस्थानच्या डी. गुकेशपुढे याच कारूआनाचे आव्हान असेल, तर कार्लसनच्या मार्गात हिंदुस्थानच्या अर्जुन एरिगॅसीचा अडथळा असेल. अमेरिकेचा हिकारू नाकामुराच्या खात्यात 13 गुण आहेत. त्यामुळे त्यालाही विजेतेपदाची संधी असेल. नाकामुराने एरिगॅसीला आर्मागेडन टायब्रेकमध्ये हरविले. त्यामुळे एरिगॅसीच्या नावापुढे 11.5 गुण कायम राहिले व तो जेतेपदाच्या शर्यतीतून बाद झाला.