नाम फाऊंडेशन, बाबा कल्याण ‘दाभोलकर पुरस्कार’चे मानकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा नगरपालिकेतर्फे देण्यात येणारा ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार’ प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाऊंडेशन’ आणि प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते, ‘भारत फोर्ज’चे सर्वेसर्वा बाबा कल्याणी यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली. हे पुरस्कार दोन वर्षांपासूनचे असून, लवकरच पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

सातारा नगरपालिकेकडून गेल्या आठ वर्षांपासून ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार’ देण्यात येत आहे. एक लाख रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजित बापट, अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी निवड समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले.

‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार’ जाहीर झालेले बाबा कल्याणी हे ‘भारत फोर्ज’चे प्रमुख असून, ते मूळचे कराड तालुक्यातील कोळे येथील आहेत. ‘भारत फोर्ज’च्या सामाजिक बांधिलकी कार्यक्रमाअंतर्गत सातारा जिह्यातील कोरेगाव, माण आणि खटाव या तालुक्यांतील 28 गावांमध्ये पाणी, आरोग्य, शिक्षण, वैयक्तिक उत्पन्नवाढ, अंतर्गत रस्ते या निर्देशांकावर गेली पाच वर्षे साताऱयात प्रभावीपणे कार्य केले आहे. या माध्यमातून 65 हजारांपेक्षा जास्त लोकांना लाभ झाला आहे. सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी हायस्कूलला त्यांनी स्वतःची जमीन दिली आहे. सातारा नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी त्यांनी स्वतःची जमीन अवघ्या एक रुपया किमतीत दिली आहे.

‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कारा’साठी पहिल्यांदाच सामाजिक संस्थेची निवड केली आहे. पुरस्कारप्राप्त ‘नाम फाऊंडेशन’ची स्थापना प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी 2015मध्ये केली. ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून विदर्भ-मराठवाडय़ातील आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली. 2015 या वर्षी आत्महत्या केलेल्या नांदेड, परभणी, हिंगोली जिह्यांतील 230 शेतकऱयांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, तसेच साहित्याचे वाटप केले. आजपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात फाऊंडेशनचे समाजकार्य सुरू आहे.